पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम हे शासकीय बंगल्यात राहण्यास येण्यापूर्वी त्या बंगल्यातील मौल्यवान वस्तु गायब झाल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर हे काल पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जाब विचारण्यासाठी गेले होते.त्यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून मनसे कार्यकर्त्यांना अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला होता.त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होत,महापालिका आयुक्त यांच्या दालनाबाहेर जवळपास तासभर ठिय्या आंदोलन केले.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,किशोर शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांसमवेत बैठक झाली.महापालिका आयुक्तांनी केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागावी,अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये केली.महापालिका आयुक्तांनी माफी मागण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.त्यामुळे पोलिसांनी मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, महेश भोईभार यांना पोलिसांनी फरफटत बाहेर काढले आणि शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आणि त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी वर्गाने काळ्या फिती लावून महापालिकेच्या आवारात निषेध सभा घेतली.

यावेळी पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जाधव जगताप म्हणाले, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेचा पदभार घेऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी झाला आहे.ते कार्यालयात येणार्‍या नागरिकांसोबत चांगल्या प्रकारे संवाद साधत आहे. त्याच दरम्यान नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली काल दुपारच्या सुमारास अधिकारी वर्गासोबत बैठक सुरू होती.त्यावेळी काही पदाधिकारी,कार्यकर्ते आतमध्ये येऊन आयुक्तासोबत चुकीच्या पद्धतीची भाषा वापरत होते.तरी देखील आयुक्त चांगल्या प्रकारे संवाद साधत होते.त्यानंतर कार्यकर्त्यांनी जे कृत्य केले. त्याबाबत मी निषेध व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून माझ्यासह सर्व अधिकारी,कर्मचारी हे महापालिकेची सेवा करीत असून येणार्‍या प्रत्येक नागरिकाची सेवा करीत आहे.त्या प्रत्येक वेळी नागरिकांनी सहकार्य केल तर आहेच.पण त्याही पुढे जाऊन आपल्या पुण्याच् नाव विविध माध्यमांतून जगभरात पोहोचवण्याच काम आपले अधिकारी करीत आहे. सर्वजण रात्र दिवस काम करीत असून दुसर्‍या बाजूला अधिकार्‍या सोबत अशा प्रकारच कृत्य करित असतील तर ते आम्ही कोणीच खपवून घेणार नाही. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तेवढ्याच ताकदीचे आहेत.जर आम्ही बाहेर आलो,तर एखादा दुसरा हात करू शकतो. आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे. आपण काही बांगड्या भरलेल्या नाहीत. तसेच स्त्रीया देखील तेवढय़ाच ताकदीच्या असून बांगड्या भरण हा वेगळा विषय आहे. आजवर अनेकवेळा अधिकारी,कर्मचारी वर्गासोबत अरेरावीची भाषा वापरली गेली आहे. आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो आणि यापुढे कोणी जर अरेरावीची भाषा केली तर आम्ही देखील अरेरावीची भाषेने उत्तर देऊ असा इशारा ते पुढे म्हणाले, या घटना रोखण्यासाठी एक नियमावली करण्याची गरज असल्याची मागणी देखील त्यांनी केली.

महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तू गायब

पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारून जवळपास दोन महिन्याचा कालावधी होत आला आहे.त्यापूर्वी डॉ. राजेंद्र भोसले हे महापालिका आयुक्त होते आणि ते चित्तरंजन वाटिका येथील बंगल्यात राहत होते.त्यांच्यानंतर नवल किशोर राम हे राहण्यास येणार असल्याने,महापालिका भवन, विद्युत, सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली.त्यावेळी घरातील चार एसी,झुंबर,ऐतिहासिक वास्तूंच्या चित्रांसह अन्य चित्रे,जुन्या काळातील पितळी कांस्य धातूचे दिवे, दोन मोठे एलईडी टीव्ही, कॉफी मेकर, वॉकीटॉकी सेट, रिमोट बेल्स, चिमणीसह सुसज्ज किचन टॉप, वॉटर प्युरिफायर असे साहित्य घरात नसल्याचे समोर आले.यामुळे एकच खळबळ उडाली.या वस्तु नेमक्या कुठे गेल्या, अशी चर्चा अधिकारी वर्गामध्ये सुरू झाली.त्याच दरम्यान आवश्यक अशा काही वस्तूची प्रशासनामार्फत खरेदी तात्काळ करण्यात आली आहे.मात्र अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी २० लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.पण मुद्दा हाच राहतो की,महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तू नेमक्या कुठे गेल्या अशी चर्चा सुरू झाली.