पुणे : कोथरूड आणि बावधन परिसरातील उलट्या, जुलाबाची साथ दूषित पाण्यातील ‘कोलिफार्म’ जीवाणूमुळे पसरल्याचे समोर आले आहे. महापालिका आरोग्य विभागाने या परिसरातील पाणी नमुन्यांच्या तपासणीत ही बाब निष्पन्न आली आहे. या भागातील उलट्या, जुलाबाची रुग्णसंख्या ११६ वर पोहोचली असून, साथ आटोक्यात आल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
कोथरूड आणि बावधन परिसरातील उजवी व डावी भुसारी कॉलनी आणि मोकाटेनगर भागात नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागात रुग्णांचे सर्वेक्षण आणि पाण्याची तपासणी सुरू केली. आरोग्य विभागाने १२ हजार ७५ घरांमधील ४४ हजार १४२ नागरिकांचे सर्वेक्षण केले. महापालिका रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात ७३ तर सर्वेक्षणामध्ये ४३ रुग्णांची नोंद झाली. या भागात ७ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत एकूण ११६ रुग्णांची नोंद झाली आहे. या भागात सोमवारी एक रुग्ण आढळला होता तर मंगळवारी एकही रुग्ण आढळून आला नाही. यामुळे हा उद्रेक आटोक्यात आल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
उलट्या, जुलाबाची साथ येण्यामागे दूषित पाणी आणि पाणी कारणीभूत असते. त्यामुळे त्या परिसरात पाणी नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाने आतापर्यंत या भागातील पाण्याचे १९३ नमुने तपासले. त्यापैकी १६ पाणी नमुन्यामध्ये ‘कोलिफार्म’ जीवाणू आढळले, तर ३८ नमुने पिण्यायोग्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दूषित पाण्यामुळेच ही साथ पसरल्याचे निदर्शनास आले आहे. याआधी सिंहगड रस्ता परिसरात दूषित पाण्यामुळे गुइलेन बरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक झाला होता. या पार्श्वभूमीवर पाणी नमुन्यांची तपासणी करण्याची सूचना आरोग्य विभागाकडून वेळोवेळी पाणी पुरवठा विभागाला केली जाते.
वयोगटनिहाय रुग्णसंख्या
वयोगट – रुग्णसंख्या
- ० ते ५ – ३
- ६ ते १५ – ८
- १६ ते ४५ – ७३
- ४६ ते ६० – २२
- ६० – १०
एकूण : ११६
बावधन परिसरात दूषित पाण्यामुळे साथ आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. या भागात पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. – डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, महापालिका