नारायणगाव : पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ आरेखनानुसारच व्हावी, यासाठी जीएमआरटी आणि रेल्वेच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा रेल्वे प्रकल्प मध्य रेल्वे करणार हे स्पष्ट करीत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे मान्य केले.

गेल्या काही वर्षांपासून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तयार केलेला डीपीआर केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. मात्र अंतिम क्षणी खोडदच्या जीएमआरटी प्रकल्पाने आक्षेप घेतल्याने रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या प्रकल्पाचा डीपीआर रद्द करुन नव्याने आखणी करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनास दिले होते. त्यानुसार या सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गात बदल करुन अहिल्या नगर, शिर्डी मार्गे नाशिक असा नवा मार्ग प्रस्तावित करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र या नवीन मार्गाला खासदार डॉ. कोल्हे यांनी विरोध दर्शवत जीएमआरटीच्या तंत्रज्ञांनी तोडगा काढावा अन्यथा जीएमआरटी प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.

पुणे ते अहिल्या नगर, शिर्डी मार्गे नाशिक या रेल्वे मार्गास खेड, आंबेगाव, जुन्नरसह नगर जिल्ह्यातील संगमनेरसह अनेक गावांतील शेतकरी व लोकप्रतिनिधींचा विरोध असून मूळ मार्ग बदलल्यास आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. मूळ रेल्वेमार्ग हा या भागातील जनतेची भाग्यरेषा बदलणारा असून आजवर विकासापासून वंचित राहिलेल्या या भागाचा विकास या रेल्वेमार्गामुळे होणार आहे, ही भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी सातत्याने मांडली आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून खासदार डॉ. कोल्हे यांनी आज रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग बदलू नये अशी मागणी केली. त्याचबरोबर महारेल, रेल्वे आणि जीएमआरटी तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करुन तोडगा काढण्याची मागणी केली. यावेळी वैष्णव यांनी हा प्रकल्प मध्य रेल्वे करणार असल्याचे स्पष्ट करतानाच प्रकल्पात कोणतीही राजकीय अडचण येणार नाही असे आश्वासन दिले. तसेच मध्य रेल्वे आणि जीएमआरटीच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे मान्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, या भागातील विकासाचा हक्क अबाधित राहावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक विकासाची संधी मिळावी, ही सर्वांची भावना आहे. त्यामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ आरेखनानुसारच व्हावा आणि लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाठपुरावा करावा असे माझे आवाहन आहे.