पुणे : ‘पुणे महानगर क्षेत्रात आर्थिक विकासाची प्रचंड क्षमता असून, ‘पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब’च्या माध्यमातून होणारा आर्थिक विकास आराखडा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी प्रारूप आर्थिक बृहत आराखडा तातडीने करावा,’ अशी सूचना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) केली.

‘पुणे महानगर ग्रोथ हब’संदर्भात विधान भवन येथे बुधवारी बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डाॅ. नितीन करीर, विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंघला, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ‘केपीआयटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पंडित यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगर, सुरत, वाराणसी, विशाखपट्टणम या पहिल्या टप्प्यातील चार शहरांसाठी तयार केलेल्या आर्थिक आराखड्यातील बाबींच्या अनुषंगाने सुब्रह्मण्यम यांनी सादरीकरण केले.

‘वाहन उद्योग, माहिती तंत्रत्रान उद्योग तसेच औद्योगिक उत्पादन क्षेत्रात पुणे अग्रेसर असल्याने येथे आर्थिक विकासाला मोठा वाव आहे. त्यामुळे या शहरासाठी निवड ‘ग्रोथ हब’साठी करण्यात आली आहे. आर्थिक विकास आणि सकल उत्पादन वाढ करून रोजगारनिर्मिती करणे यामुळे शक्य होणार आहे,’ असे सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्राची व्याप्ती, प्राधिकरणाने हाती घेतलेले रिंग रोड, रस्ते, मूळ पायाभूत सुविधा, नदी प्रदूषण रोखणे, नगररचना योजना, सांडपाणी व्यवस्था, परवडणारी घरे आदींच्या अनुषंगाने सादरीकरण या वेळी करण्यात आले. आर्थिक विकास आराखडा येत्या चार महिन्यांत अंतिम करावयाचा असल्याने संस्थेने तयार केलेल्या नमुन्यात विविध क्षेत्रांतील सर्व विभागांची माहिती आणि आर्थिक नियोजनाविषयी माहिती घेण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर आर्थिक आराखड्याविषयी भागधारकांच्या व नागरिकांच्या सूचना, प्रतिक्रियांबाबत नोंद घेण्यासाठी विविध आर्थिक क्षेत्रांतील उद्योजक तसेच नागरिकांच्या वर्गीकरणानुसार प्रश्नावली तयार करून त्यांच्या बैठका घेण्याचे निश्चित करण्यात आले.