पुणे : विवाहाच्या आमिषाने जाळ्यात ओढून फसवणूक केल्याने परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भारती विद्यापीठ भागातील एका रुग्णालयात घडली. तरुणीची फसवणूक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

परिचारिका तरुणी मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरची आहे. २४ वर्षीय परिचारिका भारती विद्यापीठ परिसरातील एका रुग्णालयात काम करत होती. रुग्णालयाच्या वसतिगृहात ती राहायला होती. परिचारिका तरुणीने ८ सप्टेंबर रोजी रुग्णालयाच्या परिचारिका वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर तिच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिचारिका तरुणीशी आरोपी तरुणाशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तरुणीबरोबर संबंध तोडले. त्याने विवाह करण्यास नकार दिला. शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे मुलीनेन ८ सप्टेंबर रोजी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे परिचारिकेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

परिचारिका तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करत आहेत. बिबवेवाडी भागात एका डाॅक्टर तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करण्यात आल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. आराेपी डाॅक्टर तरुणाने फसवणूक केल्याने डाॅक्टर तरुणीने बिबवेवाडीतील तिच्या रुग्णालयात विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली होती.