पुणे : आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनसह शहरातील शैक्षणिक संस्थांतर्फे झालेल्या ‘एज्युयूथ मीट’ या कार्यक्रमात ‘व्यसन करणार नाही आणि करू देणारही नाही…’ अशी शपथ एक लाख विद्यार्थ्यांनी घेतली. या शपथेची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

 अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाला खासदार विनय सहस्त्रबुद्धे, नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, राजेश पांडे, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजेश शास्तारे, एज्युयूथ मीटचे प्रमुख हिमांशू नगरकर, शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> परदेशी विद्यापीठांना भारतात शिक्षण संकुल सुरू करणे आव्हानात्मक, पद्म पुरस्कारप्राप्त डॉ. दीपक धर यांचे मत

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणितणावमुक्त शिक्षणासंदर्भात रविशंकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वर्षानुवर्षे आपण आंधळेपणाने शिक्षण घेत आहोत. वहारिक आयुष्यात काहीच उपयोग होत नसलेल्या अभ्यासक्रमातील प्रचंड माहितीच्या ओझ्याने आपण दबले गेले आहोत. मोबाईलच्या एका क्लिकवर सगळी माहिती उपलब्ध असते. त्यामुळे घोकंपट्टीला मारण्याला आता काही अर्थ नाही.

विद्यार्थ्यांमधील प्रतिभा जागृत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण उपयोगी ठरेल. प्रत्येक विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था आनंदाचे, नवनिर्मितीचे कॅम्पस झाले पाहिजे. नवीन शैक्षिणक धोरण हे क्रांतिकारक पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच तरुणाईच भारताला नशामुक्त करू शकते. त्यासाठी तरुणांनी नवीन उत्साह सोबत घेऊन चालायचे आहे. प्रत्येक गोष्टीतील आव्हानांचा सामना करतो तो युवा असतो. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आणि योग करा, जीवन गमावून आत्महत्या करू नका, असेही त्यांनी सांगितले.