पुणे : आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ९० लाख ३३ हजार मतदार मतदानासाठी पात्र ठरले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै रोजीच्या मतदार यादीनुसार ही संख्या अंतिम केली आहे. त्यानुसार पुण्यात ३४ लाख ४० हजार तर, पिंपरी-चिंचवडमध्ये १७ लाख मतदार महापालिकेसाठी मतदान करू शकणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका चार महिन्यात घ्याव्या, असे आदेश मे महिन्यात दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगानेही मतदानाची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार मतदार याद्या अंतिम करण्याचे काम सध्या सुरू आहे.
राज्य निवडणूक आयोग निवडणूक निवडणुकीची घोषणा करेपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अंतिम करण्यात आलेली मतदार यादी मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येते. सध्या निवडणूक विभागाकडून मतदार याद्यांचे पुनर्रीक्षण सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १५ ऑगस्ट रोजी मतदार यादीचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्टनंतर निवडणुका जाहीर झाल्यास हा प्रारूप आराखडा स्वीकारण्यात येईल, असे बोलले जात होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने गेल्या काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत एक जुलै रोजी अंतिम असलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ९० लाख ३३ हजार १०४ मतदार या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदानास पात्र ठरणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
या मतदारांमध्ये ४६ लाख ६६ हजार ९२० पुरुष, ४३ लाख ६५ हजार ३३७ महिला तर ८४७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्हा निवडणूक शाखेने विधानसभा मतदारसंघनिहाय ही आकडेवारी दिली आहे. पुणे शहरात महापालिकेसाठी आठ विधानसभा मतदारसंघ असून त्यांची एकत्रित मतदारांची संख्या ३४ लाख ४० हजार ३३८ एवढी आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी १७ लाख ७५१ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. तर उर्वरित ३८ लाख ९२ हजार १५ मतदार जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीसाठी पात्र असतील, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
पुणे शहराचा विचार करता हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण ६ लाख ४५ हजार ६९१ तर सर्वात कमी कसबा पेठ मतदारसंघात २ लाख ८५ हजार ७०१ मतदार आहेत.
- जिल्ह्यातील एकूण मतदार : ९०,३३,१०४
- पुरुष मतदार : ४६,६६,९२०
- महिला मतदार : ४३,६५,३३७
- तृतीयपंथी मतदार : ८४७
- पुणे शहर : ३४,४०,३३८
- पिंपरी शहर : १७,००,७५१