पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात दुसऱ्या टप्प्यात नऊ ठिकाणी पंतप्रधान आवास योजना राबविली जाणार आहे. या योजनेत साडेसहा हजार सदनिका बांधण्यात येणार आहेत. सदनिकेचे क्षेत्रफळ वाढवण्यात आले असून उत्पन्न मर्यादेतही वाढ केली आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे.
महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेत मोशीतील बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली, पिंपरीतील उद्यमनगर, आकुर्डीतील मोहननगर येथे गृहप्रकल्प उभारले आहेत. तेथे तीन हजार ६६८ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांना देण्यात आल्या आहेत. डुडुळगाव येथील एक हजार १९० सदनिकांच्या गृहप्रकल्पाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे रावेत येथील ९३४ सदनिकांचा गृहप्रकल्प रद्द करण्यात आला आहे. तेथील लाभार्थ्यांना किवळे येथे सदनिका देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी, ताथवडे, चोविसावाडी आणि रावेत येथे दोन या नऊ ठिकाणी महापालिकेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येणार आहे. त्यापैकी मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी आणि रावेत या सहा ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका असणार आहेत. रावेत, ताथवडे, चोविसावाडी या ठिकाणी बेघरांसाठी घरे (एचडीएच गट) गृहप्रकल्प आहे. महापालिकेने सुधारित विकास योजना आराखड्यात (डीपी) या ठिकाणच्या जागा आरक्षित केल्या आहेत.
उत्पन्न मर्यादेत वाढ
पंतप्रधान आवास योजनेत दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी पूर्वी तीन लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा होती. आता उत्पादनाची मर्यादा वाढवून सहा लाख रुपये करण्यात आली आहे.
४८४ चौरस फुटांच्या सदनिका
योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभार्थ्यांना ३० चौरस मीटर (३२३ चौरस फूट) चटई क्षेत्राची सदनिका देण्यात येत होती. मात्र, टप्पा दोनअंतर्गत आता ४५ चौरस मीटर (४८४ चौरस फूट) क्षेत्रफळाच्या सदनिका मिळणार आहेत.
पंतप्रधान आवास योजनेच्या टप्पा दोनमध्ये जास्तीत-जास्त कुटुंबांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे. उत्पन्न मर्यादेत वाढ, सदनिकांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ आणि झोपडपट्टीवासीयांच्या समावेशामुळे शहरातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
टप्पा दोनमध्ये नऊ ठिकाणी गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहेत. जागा ताब्यात घेऊन भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत नगर रचना विभागाला सूचित करण्यात आले आहे. जागा ताब्यात आल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर प्रकल्प उभारण्यास सुरुवात होईल. – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.