पुणे : गंज पेठेतील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक या दोन्ही वास्तू एकत्रित करून त्याचे विस्तारीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने निधीदेखील उपलब्ध करून दिला आहे. या दोन्ही स्मारकांना जोडणाऱ्या जागा ताब्यात घेण्यात येणार आहेत. यासाठी बाधित मिळकतदारांना मोबदला कसा पाहिजे, याचे सर्वेक्षण महापालिकेने सुरू केले आहे. यातील प्रत्येकाशी चर्चा केली जाणार असून, मोबदला नक्की कसा पाहिजे, याची माहिती गोळा केली जात असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.
महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचे विस्तारीकरणामध्ये या भागातील ९१ मिळकती बाधित होत आहेत. याचे क्षेत्रफळ सुमारे ५ हजार ३१० चौरस मीटर आहे. या मिळकतींमध्ये ५१६ मालक असून, २८५ भाडेकरु आहेत. या सर्वांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यांना या जागेचा मोबदला नक्की कशा पद्धतीने पाहिजे यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. फुले स्मारकाच्या विस्तारीकरणामध्ये बाधित होणाऱ्या मिळकतींसाठी योग्य तो मोबदला देण्याचा प्रयत्न महापालिकेचा असल्याचे दिवटे यांनी सांगितले.
महात्मा फुले सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, महापालिका यामध्ये दिरंगाई करत असल्याची नाराजी ओबीसी समाजाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भाेसले यांनी तातडीने बैठक घेत स्मारकासाठी आवश्यक असलेल्य़ा मिळकती ताब्यात घेण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांच्याकडे जबाबदारी दिली. या कामाचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. स्मारकाच्या विस्तारीकरणामध्ये जागा जात असलेल्या काही जागामालकांनी घराच्या मोबदल्यात घर, व्यावसायिक जागेच्या बदल्यात व्यावसायिक जागा द्यावी अशी मागणी केली आहे. तर काही जणांनी रोख मोबदलादेखील मागितला असल्याचे दिवटे यांनी सांगितले.
महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने आणि प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. जागा ताब्यात घेताना बाधितांना जागांचा मोबदला कसा पाहिजे, यासाठी सध्या सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका