पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित आणि पाच विशेष अशा एकूण आठ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र अद्यापही प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाने दिली.
केंद्रीय अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या संकेतस्थळावर अर्जाचा भाग एक, भाग दोन भरून ठेवावा. संबंधित विद्यार्थ्यांना सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अकरावी प्रवेशाची शेवटची संधी देण्यात येईल. गौरी-गणपती उत्सवानिमित्त काही क्षेत्रांमध्ये शाळांना स्थानिक सुट्ट्या असल्यामुळे १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान प्रवेश फेरी आयोजित करण्यात आलेली नाही. मात्र प्रवेशाचा अर्ज भाग एक, भाग दोन भरण्याची सुविधा सुरू आहे. दहावीमध्ये ‘एटीकेटी’ असलेले विद्यार्थीही अर्ज भरू शकतात. त्यांनी सहाशेपैकी एकूण प्राप्त गुण नोंदवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : गणेशोत्सवात पुणेकरांना मिळणार पावसाचे दररोज विशेष अंदाज; जाणून घ्या कसे?
यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ३२७ कनिष्ठ महाविद्यालयांत १ लाख १७ हजार ३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी १ लाख २ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत ७६ हजार ७९८ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. तर ४० हजार २३२ जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.