पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यांमध्ये घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने महापालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप याबाबत सूचना आलेल्या नसल्या, तरीही महापालिकेकडून पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये मतदार केंद्र, निवडणूक अधिकारी कार्यालयांसाठी जागा शोधणे, निवडणुकीसाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांशी संपर्क साधणे, याबाबत सूचना दिल्या.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोग किंवा राज्य सरकारने अद्याप याबाबत सूचना दिलेल्या नाहीत. त्यापूर्वीच पूर्वतयारी सुरू करण्यात आली असल्याचे अतिरिक्त आयुक्त दिवटे आणि महापालिकेचे निवडणूक विभागाचे प्रमुख प्रसाद काटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दिवटे म्हणाले, ‘आगामी निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार जागांसाठी उमेदवारांची संख्या अधिक असणार आहे. मतदान प्रक्रियेला लागणारा वेळ गृहीत धरून एका केंद्रावर आठशे मतदारांच्या मतदानाची सुविधा असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा महापालिकेच्या निवडणुकीत अधिक मतदान केंद्र असणार आहेत. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांसाठी कार्यालयांची आवश्यकता भासणार आहे. महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश करण्यात आल्याने तेथे नव्याने मतदान केंद्र उभारावी लागणार आहेत.
मतदार यादीतील प्रसिद्ध व्यक्तींची नावे तपासा
मतदार याद्यांमधून वर्षानुवर्षे असलेली ‘सेलिब्रेटीं’ची नावे वगळण्याच्या घटना अनेकदा घडतात. त्यामुळे आपल्या भागात राहत असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांची तपासणीदेखील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच निवडणुकीच्या कामासाठी अधिकचे मनुष्यबळ लागणार असल्याने राज्य सरकारच्या कार्यालयांना पत्र पाठवून त्यांच्याकडील मनुष्यबळाची महिती संकलित करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.