पुणे : पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी पुण्यात येतात. या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यात शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांतील १० टक्के रुग्णशय्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पालखी मार्गावरील मांस आणि मासळी विक्रीची दुकाने पालखीच्या कालावधीत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्यातील मार्ग दिघीपासून भवानी पेठमार्गे हडपसर येथून सासवड रस्तामार्गे फुरसुंगी, उरुळी देवाचीपर्यंत आहे. या मार्गावर २२ ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मार्ग पुण्यात बोपोडी येथून सुरू होऊन भवानी पेठमार्गे हडपसर येथून सोलापूर रस्तामार्गे मांजरी शेवाळवाडीपर्यंत आहे. या मार्गावर एकूण १६ वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच पालखी मार्गावर व जवळील भागामध्ये महापालिकेचे २२ दवाखाने व ३५ खासगी दवाखाने कार्यरत असून, त्यांच्याकडून २४ तास वारकऱ्यांना वैद्यकीय सुविधा दिली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.

पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी २४ तास वैद्यकीय पथके असतील. त्यात स्त्रीरोग तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, इतर आवश्यक कर्मचारी असणार आहेत. तसेच, हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. कमला नेहरु रुग्णालय आणि चंदुमामा सोनवणे प्रसूतिगृह येथे, तसेच महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये वारकऱ्यांवर प्राथमिक उपचार मोफत करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान आरोग्य विभागाच्या २२ रुग्णवाहिका आणि १०८ आपत्कालीन सेवेच्या २० रुग्णवाहिका असतील.

पुणे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील १० टक्के रुग्णशय्या आरक्षित ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभागात १० रुग्णशय्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असे डॉ. बोराडे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने पुण्यातील पालखी मार्ग व विसावा ठिकाणाच्या परिसरातील भटक्या व मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे. – डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका.