पुणे : पुणे महापालिकेच्या नऊ मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांनी (एसटीपी) केंद्र सरकारच्या ‘अमृत २’ योजनेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये महापालिकेच्या आठ प्रकल्पांना ४ तारांकित मानांकन मिळाले असून, मुंढवा शुद्धीकरण प्रकल्पाला पंचतारांकित मानांकन मिळाले आहे. या चमकदार कामगिरीबद्दल महापालिकेला केंद्र सरकारकडून २८ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
शहरात दररोज तयार होणारे सांडपाणी तसेच मैलापाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा नदीत सोडले जाते. यासाठी महापालिकेने शहरातील विविध भागांत मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले आहेत. प्रक्रिया केलेले पाणी नदीत सोडण्यासाठी जायका प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेला एक हजार कोटी रुपयांचा निधी मान्य झाला आहे. त्यानुसार १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. या प्रकल्पांमधून किती पाण्यावर प्रक्रिया होते, याची तपासणी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पथकाने केली.
वर्षभरात दोन वेळा ही तपासणी करण्यात आली. त्यानंतर महापालिकेला २८ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. पंचतारांकित मानांकन मिळालेल्या प्रकल्पासाठी चार कोटी, तर त्या खाली मानांकन असलेल्या प्रकल्पांना तीन कोटींचे अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.
महापालिकेच्या जुन्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांच्या ठिकाणी महापालिकेकडून केंद्र शासनाच्या नवीन निकषांनुसार प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता चांगली असावी, याची, तसेच प्रकल्पांची प्लांट ऑपरेशन, स्काडा सिस्टीम, अद्ययावत यंत्रणा, स्वच्छता आणि सुरक्षा लेखापरीक्षण यांसारख्या विविध कार्यात्मक पैलूंच्या आधारावर ही तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) मानकांनुसार करण्यात आलेल्या तपासणीच्या निष्कर्षातून आलेल्या अहवालानुसार, महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना तारांकित मानांकन देण्यात आले आहे.
महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांना २८ कोटींचे अनुदान मिळणार आहे. या अनुदानाचा वापर या प्रकल्पांसाठीच केला जाणार असून, सांडपाणी अधिक शुद्ध कसे करता येईल, यासाठी नवीन उपाययोजना, तसेच तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. – मनीषा शेकटकर, विद्युत विभाग प्रमुख, पुणे महापालिका