पुणे : गणेशोत्सव खरेदीची लगबग सुरू असताना गजबलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात पीएमपी चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. वाहतूक नियोजन करणाऱ्या चौकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे पीएमपी चालकाचे प्राण वाचले.

गणेशोेत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी रस्त्यावर सोमवारी सायंकाळी खरेदीसाठी गर्दी झाली होती. गदी आणि वाहतूक नियोजनासाठी फरासखाना वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी रोमेश ढावरे आणि अर्चना निमगरे हे बेलबाग चौकात तैनात होते. लक्ष्मी रस्त्यावरुन पुणे स्टेशन ते कोथरूड-कुंबरे पार्क या मार्गावरील बस निघाली होती. त्या वेळी बेलबाग चौकात पीएमपी चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय ४१, रा. वारजे माळवाडी) यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला.

बस चालवीत असताना पीएमपी चालक अंबुरे अस्वस्थ झाल्याने प्रवासी घाबरले. त्यांनी बेलबाग चौकात वाहतूक नियोजन करणारे पोलीस कर्मचारी ढावरे आणि निमगरे यांना हाक मारून या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस कर्मचारी ढावरे आमि निमगरे यांनी बस चालक अंबुरे यांना बसमधून बाहेर काढले. त्यांना पदपथावर झोपवून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला. अंबुरे हे बेशु्द्ध पडल्याचे लक्षात आल्यानंतर ढावरे आणि निमगरे यांनी गर्दीतून वाट काढली.

वाहतूक नियोजन करणारे फरासखाना विभागाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे आणि उपनिरीक्षक संजय गायकवाड यांना घटनेची माहिती दिली. गर्दीत रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर होणार असल्याची शक्यता होती. त्यामुुळे ढावरे आणि निमगरे यांनी गर्दीत रिक्षाचालक राजेश शंकर आरकल (रा. मार्केट यार्ड) यांना थांबविले. आरकल यांनी त्वरीत पोलिसांच्या मदतीने बेशु्द्धावस्थेतील बस चालक अंबुरे यांना रिक्षात बसवले. बेलबाग चौकातून गर्दीतून वाट काढत रिक्षा खासगी रुग्णालयात पोहोचली. अंबुरे यांना तातडीने उपाचारासाठी दाखल करण्यात आले. अंबुरे यांच्यावर त्वरीत उपचार करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले. पोलीस कर्मचारी ढावरे, निमगिरे आणि रिक्षाचालक आरकल यांच्या तत्परतेमुळे अंबुरे यांचे प्राण वाचले.