पुणे : हिंजवडी आयटी पार्कसह परिसरात अवजड वाहनांमुळे अपघात वाढले असून, काही जणांना जीवही गमावावा लागला आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अवजड वाहनांवर निर्बंध लागू केले आहेत. पोलिसांनी आखून दिलेल्या वेळेतच अवजड वाहनांना प्रवेश आणि चालक नशेत नसल्याची तपासणी या बाबी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणारी अवजड वाहने ज्या बांधकाम व्यवसायिकांची असतील त्यांची बांधकामेही थांबवण्यात येणार आहेत.

हिंजवडी आयटी पार्क परिसरात अवजड वाहनांमुळे अपघात वाढले आहेत. याप्रकरणी आयटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून प्रशासनाकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’चे अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यात हिंजवडीसह परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेने निर्धारित केलेल्या वेळेतच अवजड वाहने शहरात यावीत, या नियमाचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बांधकाम व्यावसायिकांनी याबाबत खबरदारी घ्यावयाची आहे. बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी रहदारीच्या नियमांचे पालन करावे. वाहनचालक नशेत नसल्याची आणि त्याचा परवाना अद्ययावत असल्याची खात्री करून एकत्रित माहिती विकासकाने त्याच्या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर अद्ययावत ठेवावी, असे निर्णयही घेण्यात आले.

आयटीनगरी असलेल्या हिंजवडी – माण भागात सकाळी आणि सायंकाळी दुचाकींसह चारचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. याच वेळी बऱ्याचदा बांधकाम व्यावसायिकांची अवजड वाहने या मार्गावर धावत असल्याने इतर वाहनचालकांना अडचणी येतात. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी निर्देश दिले होते. सध्या हिंजवडी, माण, म्हाळुंगे परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी बांधकाम करताना अवजड वाहनांद्वारे सिमेंट, लोखंड आदी साहित्याची वाहतूक करावी लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण झाला असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात टाळण्यासाठी पीएमआरडीएने आता पावले उचलली आहेत.

काम थांबविण्याचा इशारा

हिंजवडी भागात १० सप्टेंबर रोजी काँक्रीट मिक्सरखाली सापडून एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित वाहनचालकावर गुन्हा नोंदवला असून, याआधारे पीएमआरडीएने संबंधित वाहन कार्यरत असलेल्या बांधकामाची परवानगी रोखण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर भाले यांनी दिली.