बुलेट सायलेन्सर मोठ मोठ्याने वाजवून रस्त्यावरून रुबाबात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर पुणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बुलेट सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. एकाच दिवसात तब्बल ३४६ बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली.

विशेष म्हणजे सायलेन्सर प्रकरणी बुलेट चालकांवर दोन वेळेस कारवाई झालेली असेल, तर आता यापुढे सायलेंसर बदलून देणाऱ्या गॅरेज चालक, मालकाला सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली. 

सायलेन्सर किती मोठ्याने वाजतो या स्पर्धेने सर्वसामान्य बेजार

बुलेट रुबाबात चालवण्या बरोबरच त्याचा सायलेन्सर किती मोठ्याने वाजतो याची स्पर्धा बुलेट स्वारांमध्ये असते. त्यामुळे कर्णकर्कश आवाजाने गल्ली-बोळात तरुण फेऱ्या मारताना हमखास दिसतात. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. बुलेट स्वारांना काही बोलल्यास अरेरावीवर येतात. त्यामुळं वाहतूक पोलीस देखील अनेकदा नरमाईची भूमिका घेताना दिसतात. परंतु, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी कारवाईला गती दिली आहे.

पोलीस आयुक्तालयातील १३ वाहतूक विभागामार्फत बुलेट स्वारांवर कारवाई करण्यात आली. यात, एकूण ३४६ जणांवर कारवाई करत ३ लाख ४६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सांगवी – ८४, हिंजवडी- ४४, निगडी- ६०, चिंचवड- २९, पिंपरी- १५, भोसरी- १, चाकण – २८, तळेगाव, देहूरोड – ९, दिघी, आळंदी – १०, तळवडे – २०, वाकड – २१, तळेगाव – ४, म्हाळुंगे – २१ अशा एकूण – ३४६ बुलेट स्वारांवर कारवाई करण्यात आलीय.

हेही वाचा : पुणे: अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएची कारवाई, ४५ गाळ्यांवर फिरवला बुलडोजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी चिंचवडमधील ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.