पुणे : शहरात वाहन चोऱ्यांबरोबरच वाहनांचे सुटे भाग देखील चोरले जात असून, ऑटो रिक्षांचे टायर आणि स्टेपनीची चोरी करणाऱ्या एका चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
शादाब युसुफ अन्सारी (वय २०, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमित शेटे तसेच पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि अतुल पंधरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शहरातून वाहन चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सातत्याने या घटना घडत असतानाच वाहनांचे सुटे भागही चोरीला जात असल्याचे दिसून आलेले आहे. काळेपडळ भागातून रिक्षांचे टायर आणि स्टेपनी चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि अतुल पंधरकर यांना शादाब अन्सारी याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन रिक्षा, रिक्षांचे टायर आणि स्टेपनी असा २ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक निरीक्षक अमित शेटे पुढील तपास करीत आहेत.