पुणे : रेल्वे प्रवासी महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने बॅगेतील सोन्याच्या बांगड्या, अंगठी असा ऐवज लांबविणाऱ्या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून अटक केली. चोरट्याने पुणे आणि मिरज रेल्वे स्थानकात प्रवाशांकडील ऐवज लांबविल्याचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून ११० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

रमेश उर्फ मोटा पिता फूलचंद (रा. न्यू अनाज मंडी, नजफगड, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिला बडोदा-पुणे या मार्गावरील रेल्वेने २५ मे रोजी प्रवास करत होत्या. पुणे रेल्वे स्थानकाजवळ गाडी आल्याने महिलेने खडकी परिसरात तिच्याकडील बॅग दरवाज्यात आणून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चोरटा रमेश डब्यात होता. त्याने प्रवासी महिलेला दरवाज्यापर्यत बॅग ठेवतो, असे सांगितले. महिलेला मदत करण्याचा बहाणा करुन त्याने बॅगेतून ५२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, तसेच एक ग्रॅम वजनाची लहान मुलांची अंगठी असा ऐवज लांबविला.

बॅगेतून ऐवज चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पुणे लोहमार्ग पोलीस दलाच्या अधीक्षक अश्विनी सानप यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या. पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा रमेश आणि त्याच्याबरोबर असलेल्या चार साथीदारांनी बॅगेतून ऐवज चोरल्याचे उघडकीस आले. आरोपी रमेश दिल्लीत राहत असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. दिल्ली पोलिसांच्या मदतीने आरोपी रमेशला पकडले. चौकशीत त्याने मिरज रेल्वे स्थानकात प्रवासी महिलेला मदत करण्याचा बहाणा करुन ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविल्यचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडून ११० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले.

पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इरफान शेख, सहायक निरीक्षक प्रभाकर कापुरे, उपनिरीक्षक सुनील माने, दीपक धिवार, सुरेश रासकर, हवालदार दीपक ठोंबरे, संदीप काटे, प्रशांत डोईफोडे, उदय चिले, अमित गवारी, मिथून जानकर, रितेश राठोड यांनी ही कामगिरी केली.

रेल्वे प्रवाशांना आवाहन

रेल्वे प्रवाशांना मदत करण्याच्या बहाण्याने चोरटे बॅगेतून ऐवज लांबवितात. रेल्वे प्रवाशानी चोरट्यांच्या बता‌णीवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले आहे.