शहरातील कायदा सुव्यवस्थेला बाधा न आणता शांततेत आंदोलन करा. राजकीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करू नका तसेच नेत्यांच्या वाहनांचा ताफाही अडवू नका. आंदाेलन ठरवून दिलेल्या ठिकाणी करा. आंदोलन करताना कायदा सुव्यवस्थेला बाधा आणू नका, अशा सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बैठकीत शनिवारी दिल्या.

गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप तसेच आंदोलनांमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शनिवारी सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधुरी मिसाळ, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आदी यावेळी उपस्थित होते.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागता कामा नये. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. पाेलिसांची परवानगी घेऊन आंदोलन करावे तसेच ज्या ठिकाणी आंदोलनाचे स्थळ निश्चित करण्यात आले आहे तेथे आंदोलन करावे. समाजमाध्यमावर टीका टिपण्णी करताना भान राखावे. समाजात द्वेष किंवा चिथावणी देणारे संदेश समाजमाध्यमातून प्रसारित करू नयेत, अशा सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बैठकीत दिल्या. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

राजकीय पक्षांचे पदाधिकारी काय म्हणाले ?

समाजमाध्यमावर एखाद्या पक्षाच्या नेत्याविषयी टीका टिपण्णी करताना भान राखायला हवे. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल, असे कृत्य करता कामा नये. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येईल, असे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले. सर्व पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन करताना पुण्यातील राजकीय संस्कृतीला गालबोट लागणार नाही, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांना देण्यात आली, असे राष्ट्रवादी काँँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जाईल, असे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.