पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘फ्रेशर्स पार्टी’ आयोजित करून गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास संबंधित पार्टी आयोजक इव्हेंट कंपनी, पब आणि हाॅटेलचा परवाना रद्द करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. अल्पवयीनांना मद्य विक्री केल्याचे आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
आठवड्यापूर्वी मुंढव्यातील पिंगळे वस्ती परिसरात एका पबमध्ये फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी पोलीस, तसेच उत्पादनशु्ल्क विभागाची परवानागी घेण्यात आली नव्हती. पार्टीतील तरुणांनी रस्त्यात मद्याच्या बाटल्या फोडल्यानंतर रहिवासी आक्रमक झाले. त्यांनी पबचालकाला जाब विचारल्याने वादावादाची घटना घडली होती. रहिवाशांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर शनिवारी (२३ ऑगस्ट) मध्यरात्री राजा बहादूर मिल परिसरातील एका पबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत १०० ते १५० महाविद्यालयीन तरुण-तरुणी सहभागी हाेत्या. विद्यार्थी अल्पवयीन असताना त्यांना मद्य विक्री करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. संबंधित पब, हाॅटेलमालकाने पोलीस, तसेच उत्पादनशुल्क विभागाची परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली आहे.
‘शहरातील काही बार, पबमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या नियमावलीचे उल्लंघन करून अल्पवयीनांना मद्य विक्री केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणे, तसेच हाॅटेल, पबचालकांनी अल्पवयीनांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे. अल्पवयीनांकडे असलेल्या डिजिलाॅकर सुविधेतील कागदपत्रे तपासावीत. अशा कार्यक्रमांत महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होत असल्यास त्यांना परावृत्त करावे. महाविद्यालयांना याबाबतची सूचना द्यावी. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने असा कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल,’ असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
फ्रेशर्स पार्टीप्रकरणी गुन्हा दाखल
महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी फ्रेशर्स पार्टी आयोजित केल्याप्रकरणी पोलिसांनी बंडगार्डन येथील राजा बहादूर मिलमधील एका पबचालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अमित बधे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आयोजकांनी इव्हेंटसंदर्भात कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही, तसेच विनापरवाना फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले. पार्टीसाठी १०० ते १५० युवक-युवतींना आमंत्रित केले. संबंधित पबमालकांनी कोणत्याही पार्टीची पूर्वसूचना दिली नव्हती, तसेच परवानगी घेतली नव्हती, असे फिर्यादीत म्हटले आहे.