डेक्कन भागातील आपटे रस्त्यावर असलेल्या कोहिनूर हॉटेलमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या चोरीचा अद्याप छडा लागलेला नाही. हॉटेलच्या तळमजल्यावरील एका खोलीत ३७ लाखांची रोकड ठेवलेली तिजोरी चोरटय़ांनी लांबविली. विशेष म्हणजे या खोलीत जाण्यासाठी तीन कुलूपबंद दरवाजे उघडून जावे लागत होते. चोरटे हे तीन दरवाजे उघडून रोकड ठेवलेल्या खोलीत शिरले आणि वीस किलो वजनाची तिजोरी उचलून पसार झाले. रोकड लांबवणारा चोरटा माहीतगार असल्याच्या संशयानंतर पोलिसांनी अनेक शक्यता गृहित धरून तपासदेखील केला. कोहिनूर हॉटेलमधील चोरी उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून आजही प्रयत्न सुरू आहेत. तिजोरी उचलून मोटारीत ठेवणाऱ्या चोरटय़ांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले. मात्र, चोरटय़ांचा माग काढण्यात पोलिसांना अपयश आले.
गजबजलेल्या आपटे रस्त्यावरील कोहिनूर हॉटेल हे एक प्रसिद्ध हॉटेल आहे. पुण्यातील काही जुन्या हॉटेलांमध्ये कोहिनूर हॉटेलचा समावेश होतो. या हॉटेलमधून १८ नोव्हेंबर २०१५ रोजी तिजोरीत ठेवलेली ३७ लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. ही रोकड तळमजल्यावरील एका खोलीत कपाटात ठेवण्यात आली होती. या खोलीत जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत. तीन दरवाज्यांचे कुलूप उघडून या खोलीत प्रवेश करता येत होता. त्यामुळे हॉटेलमधील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांशिवाय या खोलीत पोहोचणे तितकेसे सोपे नाही. तळमजल्यावर असलेल्या खोलीत जाण्यासाठी तीन दरवाज्यांचे कुलूप तोडून चोरटय़ांनी तेथे प्रवेश केला. खोलीत ठेवलेली तिजोरी उचकटून रोकड लांबविली. ही घटना उघडकीस आल्यानंतर कोहिनूर हॉटेलचे व्यवस्थापक राजेश तिखे (रा. कोथरूड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेतली. डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. डेक्कनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले आणि गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर हॉटेलमधे रोकड ठेवल्याने पोलिसांनी व्यवस्थापकांकडे चौकशी केली. एक एप्रिलपासून जमा झालेली रोकड हॉटेलमध्ये ठेवण्यात आली होती. हॉटेलमधील अंतर्गत काम सुरू असल्याने पैसे द्यावे लागणार होते. प्रत्येक वेळी बँकेतून रोकड काढणे शक्य होणार नसल्याने रोकड हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
कोहिनूर हॉटेलमध्ये आलेले चोरटे मध्यरात्री मोटारीतून आले होते. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा रखवालदार गाढ झोपेत असल्याचे उघड झाले होते. ज्या पद्धतीने चोरी करण्यात आली ते पाहता चोरीत माहीतगाराचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. काही कर्मचाऱ्यांनी काम सोडले होते. अशा कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलविले होते. हॉटेलचे मालक माधव कोकणे हे मुंबईत राहायला आहेत. त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी कोहिनूर हॉटेलचे आवार, अंतर्गत भाग तसेच आपटे रस्ता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेतले. तिजोरी उचलून मोटारीत ठेवणाऱ्या चोरटय़ांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले होते. पोलिसांनी आपटे रस्ता, डेक्कन भागातील सतरा ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेल्या चित्रीकरणाची पडताळणी केली. त्याआधारे पोलिसांनी मुंबईसह राज्यातील अन्य शहरात तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या पथकांनी डेक्कन भाग पिंजून काढला. पुणे शहर तसेच मुंबई परिसरातील सराईत चोरटय़ांची माहिती घेतली. ज्या पद्धतीने चोरी करण्यात आली. ते पाहता चोरटे सराईत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पुणे-मुंबईतील सराईत चोरटय़ांच्या हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात आले.
या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले म्हणाले की, कोहिनूर हॉटेलमध्ये झालेल्या चोरीचा पोलिसांकडून अनेक पातळीवर तपास करण्यात आला होता. हॉटेलमधील प्रत्येक कर्मचाऱ्याची वैयक्तिक चौकशी पोलिसांकडून करण्यात आली होती. कोहिनूर हॉटेलसमोर असलेल्या एका हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी बाहेर पडणाऱ्या चोरटय़ांना टिपले होते. आपटे शाळेनजीक चोरटय़ांनी मोटार लावली होती. पोलिसांनी मोटारीचा माग काढण्यासाठी प्रयत्न केले.गॅरेज चालकांची चौकशी करण्यात आली. अनेक पातळीवर तपास करण्यात आला. तांत्रिक तपास, सराईत चोरटय़ांची चौकशी, मुंबईत जाऊन तपास केल्यानंतरही पोलिसांना कोहिनूर हॉटेलमधील चोरीचा उलगडा करण्यात अपयश आले.