श्री क्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी (११ जून) दुपारी चार वाजता प्रस्थान ठेवणार आहे. सोमवारी (१२ जून) सकाळी पालखी सोहळ्याची पुण्यनगरीकडे वाटचाल सुरू होईल. यादरम्यान पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वारकऱ्यांचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.

पुण्यात १२ जूनपासून पालखी मिरवणूक निघणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलीस सज्ज आहेत. दरम्यान, वारकऱ्यांना टार्गेट करून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरांच्या टोळीवर पोलिसांची करडी नजर आहे.

हडपसर व वानवरी पोलिस ठाण्याजवळ गस्तीदरम्यान रविदर्शन चौकाजवळील राज्य परिवहन बसस्थानकावर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना पकडले. श्रीकांत राजू जाधव (२१) आणि दिलीप बलभीम गायकवाड (३३, दोघे रा. मुंढवा) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अनेक मोबाईल फोन सापडले आहेत. त्यांच्याकडून एकूण १.१० लाख किमतीचे मोबाईल फोन जप्त केले असून ते हडपसर, मुंढवा, बंड गार्डन आणि बिबवेवाडी येथे झालेल्या चोरीशी संबंधित होते. हे चोरीचे मोबाईल चोर कर्नाटकात पोहोचवणार होते, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. हिंदूस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहेत.

चोरीचा कट उधळला

पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल फोनबाबत आरोपींकडे अधिक चौकशी केली. परंतु, त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता आषाढी वारीच्या पालखी शहरातून मार्गक्रमण करत असताना आरोपींनी चोरीचा कट आखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरीला गेलेल्या मोबाईल संदर्भात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 379 अंतर्गत हडपसर, मुंढवा, बंड गार्डन आणि बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालखी मिरवणुकीत नागरिकांची सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.