पुणे : ओळखीचा गैरफायदा घेऊन पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने महिलेसह तिचा पती, मुलाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याने वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार कुटुंबाकडून ७३ तोळे दागिने, १७ लाख रुपयांची रोकड घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश अशोक जगताप (रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका ५१ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि जगताप हे परिचित आहेत. जगताप यांनी ओळखीचा गैरफायदा घेतला. जगताप यांनी महिलेला वेगवेगळी कारणे सांगितली. आर्थिक विवंचनेत असल्याची बतावणी त्यांनी केली. बायकोवर शस्त्रक्रिया करायची आहे, तसेच मुलीची फी भरायची आहे, अशी बतावणी करून तक्रारदार महिलेकडून वेळोवेळी ७३ तोळे सोने घेतले. महिलेच्या मुलाला बँकेकडून कर्ज काढायला सांगितले, तसेच महिलेच्या पतीकडे बतावणी करून त्यांच्याकडून वेळोवेेळी १७ लाख ६४ हजार रुपये उकळले. २०१९ ते २०२२ या काळात जगताप यांनी वेळोवेळी रक्कम आणि दागिने घेतले, असे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पैसे परत करतो, असे सांगून टोलवाटोलवी केली. मात्र, प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी
पोलीस कर्मचारी गणेश जगताप यांनी तक्रारादार महिलेकडे गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी केली होती. वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी महिलेकडून ७३ तोळे सोन्याचे दागिने, रोकड उकळली. यापूर्वी जगताप यांनी औंध येथील एका सराफाचीही फसवणूक केली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन जगताप यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते.