पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी एकास अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी मुख्य सूत्रधारांच्या संपर्कात असल्याचे तांत्रिक तपासात उघडकीस आले आहे.अभिजित अरुण मानकर (वय ३१, रा. दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दि. ५ जानेवारी रोजी मोहोळचा कोथरुडमधील सुतारदरा परिसरात खून करण्यात आला. मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकरसह आरोपींनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. खून प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली.
हेही वाचा…धक्कादायक! पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ठेवी किती?… अधिकाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाइल संचाची तांत्रिक पडताळणी करण्यात आली. आरोपींच्या मोबाइलमध्ये १९ हजार ८२७ ध्वनिमुद्रित फिती (रेकॉर्डिंग) आढळून आल्या आहेत. त्यांपैकी १० हजार ध्वनिमुद्रित फितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यांपैकी सहा ध्वनिमुद्रित फिती मोहोळ खून प्रकरणाशी संबंधित आहेत.खून करताना प्रत्यक्ष जागेवर असणारा मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात आरोपी मानकर होता. मानकरची या प्रकरणात चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार, पोळेकर, कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, गणेश मारणे यांना न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.