पुणे : मानाच्या राष्ट्रपती पदकासाठी पुणे पोलीस दलातील एकाही अधिकारी तसेच कर्मचाऱ्याने अर्ज सादर केला नाही. राष्ट्रपती पदकापासून पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी वंचित राहण्याची ही पहिलीच वेळ असून अर्ज सादर न करण्यामागे पोलिसांचा निरुत्साह असल्याची चर्चा पुणे पोलीस दलात सुरू आहे.

पोलीस दलात उल्लेखनीय, प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येते. प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात येते. पोलिसांसह कारागृह, अग्निशमन दल, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ), केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील (सीआरपीएफ) कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात येते. राष्ट्रपती पदकासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची निवड होण्यापूर्वी त्यांना राष्ट्रपती पदकासाठी इच्छुक असल्याचा अर्ज तयार करावा लागतो. या अर्जासह सेवा पुस्तकातील (शीट) बक्षीसे, उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट तपास, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आदी बाबींची नोंद करावी लागते.

सेवा कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्याला शिक्षा झाल्यास त्याला राष्ट्रपती पदकासाठी अर्ज सादर करता येत नाही. कोणतीही शिक्षा, कसूरी न करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचारी राष्ट्रपती पदकासाठी अर्ज सादर करतात. राष्ट्रपती पदक जाहीर करण्यापूर्वी पाच ते सहा महिने आधी इच्छुक पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यात येतात. या अर्जाची पडताळणी करून पोलीस आयुक्त किंवा संबंधित विभागाच्या प्रमुखांकडून राष्ट्रपती पदकासाठी इच्छुकांचे अर्ज गृहविभागाकडे सादर करण्यात येतात. त्यानंतर निवड समितीकडून पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात येते.

यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर करण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पदकासाठी पुणे पोलीस दलातील एकाही कर्मचाऱ्याने अर्ज सादर केला नाही. अर्ज सादर न केल्याने पुणे पोलिस दलातील कर्मचारी यंदा राष्ट्रपती पदकापासून वंचित राहिले. पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा निरुत्साहामुळे राष्ट्रपती पदकासाठी अर्ज सादर करण्यात आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारणे वेगळीच पुणे पोलीस दलातील एक पोलीस हवालदार राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. पोलीस हवालदाराला सेवा कालावधीत खातेअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्षा दिली होती. या शिक्षेची नोंद सेवापुस्तकात होती. सेवापुस्तकातील शिक्षेची नोंद राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी अडसर ठरत होती. त्यामुळे संबंधित पोलीस हवालदाराने सेवा पुस्तकातील शिक्षेची नोंद काढून टाकण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील लिपकाशी संगमनत केले आणि शिक्षेची नोंद असलेले सेवापुस्तकातील पान बदलेले. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर चार महिन्यांपूर्वी पोलीस हवालदार आणि पोलीस आयुक्तालयातील लिपिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हवालदारा अटकही झाली होती. या घटनेमुळे पोलीस दलातील राष्ट्रपती पदकासाठीच्या इच्छुक पोलीस कर्मचारी धास्तावले आणि त्यांनी अर्जच सादर केले नाही, अशी चर्चा पोलीस आयुक्तालयात दबक्या आवाजात सुरू आहे.