गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल झाले आहेत. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम याला महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. फिटनेसवर तरुणांपासून वयोवृद्ध देखील भर देताना पाहायला मिळत आहे. यामुळे फिटनेसचा संदेश देण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने चक्क देहू ते पंढरपूर अशी 234 किलोमीटर सायकल वारी केली आहे. राम गोमारे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. राम गोमारे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी कार्यरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम गोमारे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मेहनत घेत सायकलिंग, स्विमिंग आणि धावण्याचा व्यायाम सुरू ठेवला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हेदेखील फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरूक असतात. त्यांचाच आदर्श समोर ठेवत राम गोमारे यांनीही फिटनेसला महत्त्वा दिले आहे. मात्र, आपण स्वतः तर धडधाकट राहूच पण पोलीस सहकारी, इतर मित्रांना देखील फिटनेसचे महत्त्व पटवून देऊ असे गोमारे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गोमारे यांनी हे महत्त्व पटवून देण्यासाठी देहू ते पंढरपूर असा सायकलवरून प्रवास करायच ठरवले होते. देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेत गोमारे यांनी पंढरपूरपर्यंत सायकल प्रवास केला आहे. केवळ एका ठिकाणी दहा मिनिटांचा थांबा घेत गोमारे यांनी पंढपूर गाठले आहे.

सलग आठ तास सायकल चालवत राम गोमारे यांनी देहू ते पंढरपूर असा २३४ किलोमीटर प्रवास केला आहे. त्यामुळे गोमारे यांनी पंढरपूर पर्यंत फिटनेस वारीच केली आहे. करोनाकाळात पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम करणं गरजेचं असल्याचं सांगत राम गोमारे यांनी दररोज किमान एक तास स्वतःसाठी देऊन व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police officer dehu to pandharpur cycle ride to prove the importance of fitness abn 97 kjp
First published on: 08-01-2022 at 14:29 IST