पुणे : हडपसर भागात सुरू असलेल्या बेकायदा काॅल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. या काॅलसेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले. तेथून २९ लॅपटाॅप, २० संगणक, ४१ मोबाइल संच, राऊटर, अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत २९ जणांना ताब्यात घेण्यात आले.
हडपसरमधील एका व्यावसायिक संकुलात बेकायदा काॅल सेंटर चालविले जात होते. या काॅल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या मोबाइलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेत होते. बँक खाते, तसेच डेबीट कार्डची गोपनीय माहिती मिळवून फसवणूक केली जात होती. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने काॅल सेंटरवर छापा टाकला. या प्रकरणी कॉल सेंटरचा चालक निर्मल शहा, अतुल श्रीमाळी, युगंधर हादगे यांच्यासह २९ जणांना ताब्यात घेण्यात आले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, छबू बेरड, उपनिरीक्षक प्रमोद खरात संतोष तानवडे, अभिजित पवार राजस शेख, प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे, प्रताप गायकवाड यांनी ही कामगिरी केली.