पुणे : महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली असून, पहिल्या दोन दिवसांत २७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ७१ जणांवर गुन्हे दाखल करण्यासाठी महापालिकेने पोलिसांना पत्र दिले आहे. ही कारवाई येणाऱ्या काळात अधिक कडक केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांसह चौकांमध्ये बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर कारवाई करणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. बेकायदा फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले आहेत. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

आयुक्तांच्या आदेशानंतर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांच्यासह आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्यासह पाच झोनचे उपायुक्त रस्त्यांवर उतरले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये शहाराच्या विविध भागांमध्ये बेकायदा जाहिरात फलक काढून टाकण्याची मोहीम हाती घेत पाच हजारांपेक्षा अधिक फलक हटविण्यात आले आहेत. ७१ प्रकरणांत पोलिसांना संबधितांनवर गुन्हे दाखल करण्याबाबत महापालिकेकडून पत्र देण्यात आले आहे.

‘महापालिकेने दिलेल्या पत्राच्या आधारावर २७ प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत,’ अशी माहिती पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुुरुवात झाली आहे. महापालिकेने ७१ जणांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पत्र पोलिसांना दिले आहे. त्यापैकी २७ जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी सांगितले.

शहराच्या बेकायदा फलक लावून विद्रुपीकरणाचे प्रकार वाढले आहेत. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्ते, वीजेचे खांब आणि चौकांमध्ये हजारो बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. याविरोधात विशेष मोहीम राबवून संबधित जाहिरात फलक काढुन ते लावणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मागील आठवड्यात महापालिका  आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

राजकीय फलकांना अभय ?

महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्यांनी मोठ्या प्रमाणात शहरभर बेकायदा फलक लावले आहेत. मात्र, फलकांवर कारवाई करताना राजकीय पक्षांच्या फलकांकडे दुर्लक्ष करून व्यावसायिकांनी लावलेल्या फलकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. प्रशासन कारवाई करताना दुजाभाव करीत असल्याचे पुरावे आयुक्त नवल किशोर राम यांना देणार असल्याचेही काही व्यावसायिकांनी सांगितले.