पुणे : सराईतांकडून देशी बनावटीच्या चार पिस्तुलांसह पाच काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हडपसर भागातील महंमदवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तिघांना अटक केली.
आसिफ सबीरखान तेली (वय २१), यश सुभाष मदने (वय २०, रा. भीमरत्ननगर, कसबा, बारामती, जि. पुणे), प्रथमेश संदीप लोंढे (वय २४, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आसिफ, प्रथमेश, यश हे सराईत आहेत. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. आसिफ हा साथीदारांसोबत महंमदवाडीीतल हेवन पार्क रस्त्यावर साथीदारांसोबत थांबला होता. तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून आसिफ, प्रथमेश, यश यांना पकडले. त्यांच्या झडती घेण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीची चार पिस्तुले, तसेच पाच काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपींनी पिस्तुले का बाळगली, तसेच त्यांनी पिस्तुले कोणाकडून आणली ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गाेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिग तेली, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक विनायक गुरव, पोलीस कर्मचारी प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, संजय बागल, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख यांनी ही कारवाई केली.
सिंहगड रस्ता भागात हुक्का पार्लरवर छापा
सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील एका सदनिकेत चालविण्यात येत असलेेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पात्र, तसेच सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील एका इमारतीतअ असलेल्या सदनिकेत हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.
या कारवाईत हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक निरीक्षक गणेश माेहिते, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी ही कारवाई केली. राज्य शासनाने कमला मिल दुर्घटनेनंतर हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. बंदी घातल्यानंतर काही जण छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालवित असल्याचे आढळून आले आहे.
