पुणे : टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांची होणारी लूट आणि बोपदेव घाटातील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील टेकड्यांचा विषय ऐरणीवर आला होता. तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील सात नव्या पोलिस ठाण्यांच्या उद्घाटन कार्यक्रमात ‘शहरातील टेकड्या आणि अन्य ब्लॅक स्पॉट सुरक्षित करण्यासाठी आवश्यक स्वतंत्र निधी देण्यात येईल,’ असे जाहीर केले होते. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तेराहून अधिक टेकड्या आणि सातहून अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, संबंधित ठिकाणे सीसीटीव्ही आणि प्रकाशझोताच्या माध्यमातून सुरक्षित केली जाणार आहेत. यासंदर्भातील अहवाल सोमवारी (२ डिसेंबर) राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

शहरातील टेकड्या आणि ब्लॅक स्पॉटवर ६०० अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामध्ये पीटीझेड कॅमेरे, फिक्स कॅमेरे आणि एएनपीआर कॅमेरे यांचा समावेश असून सराईत गुन्हेगारांचे चेहरे बंदिस्त करण्यासाठी (फेस रिडींग) कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत. टेकड्यांसह ब्लॅक स्पॉटवर कॅमेऱ्यांसह पॅनिक बटण असणार आहे. पॅनिक बटण दाबताच थेट पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रूम) अलर्ट मिळणार आहे. त्यासोबतच पॅनिक बटणवर असलेल्या कॅमेऱ्यामुळे थेट तेथील व्हिडिओ चित्रीकरण देखील दिसण्यास सुरूवात होणार आहे. पॅनिक बटण दाबण्याच्या एक मिनीट आधीचा आणि नंतरचा व्हिडिओ त्या विशेष कॅमेऱ्याद्वारे चित्रीत केला जाईल अशी सुविधा यामध्ये असणार आहे. याशिवाय पॅनिक बटण दाबताच त्या परिसरातील अन्य कॅमेरे देखील अलर्ट मोडवर जातील असे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या वाहनातही पॅनिक बटणचा वापर होताच मोठा गजर (अलार्म) वाजणार आहे, जेणेकरून गस्तीवरील पोलिसांना लगेचच संबंधित ठिकाणी पोहोचण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा >>>सहकार क्षेत्रातील पराभूतांपुढे आव्हान

टु वे पीए सिस्टिम

टेकडीच्या भागांमध्ये ‘टु वे पीए सिस्टिम’ (माईक आणि स्पिकर) देखील लावले जाणार आहेत. याशिवाय रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसावे म्हणून १७७ पेक्षा अधिक प्रखर प्रकाशझोत (फ्लड लाइट्स) लावले जाणार आहेत. एकंदरीतच सिटी सर्वेलन्सचे बेस्ट फिचर्स यामध्ये समाविष्ट करण्यात आले असून, यामुळे अनधिकृत आणि अवैध घटनांना प्रतिबंध घालण्यास मदत होणार आहे. त्यासोबतच या ठिकाणी कमीत कमी वेळेत पोलीस पोहोचावेत यासाठी सात विशेष मोबाईल सर्विलन्स व्हेईकल देखील तैनात करण्यात येणार

आहेत. पोलिसांच्या या सातही वाहनांमध्ये ड्रोन कॅमेरे असणार आहे. त्यासाठी अंदाजे ७० कोटी रुपये खर्च येणार असून, त्पाच वर्षांच्या देखभाल दुरूस्तीचा देखील समावेश असणार आहे. शक्यतो शहरातील सर्वच टेकड्यांवर मोबाईलला रेंज आहे. मात्र, ज्या ठिकाणी रेंज नसेल त्याठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित राहण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे कनेक्टिव्हिटी दिली जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>‘पीएमआरडीए’च्या घरांना वाढता प्रतिसाद, अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस

पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये हनुमान टेकडी, जुना बोगदा घाट, तळजाई, सुतारदरा, एआरएआय टेकडी, अरण्येश्वर मंदीर, बाणेर टेकडी, बोलाई माता मंदीर, जोगेश्वरी मंदीर, वेताळबाबा टेकडी, चतु:श्रृंगी टेकडी, बोपदेव घाट, पारसी ग्राऊंड, पर्वती, कॅनॉल रोड या टेकड्यांसह अन्य ठिकाणांचा समावेश असणार आहे.शहरातील टेकड्यांवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पुणे पोलिस दलाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील तेराहून अधिक टेकड्या आणि सातहून अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, संबंधित ठिकाणे सीसीटीव्ही आणि प्रकाशझोताच्या माध्यमातून सुरक्षित केली जाणार आहेत. आणखी एका सर्वेक्षणानंतर सोमवारी (२ डिसेंबर) यासंबंधीचा अहवाल गृह विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.अमितेश कुमार, पोलीस आयुक्त