दुचाकीवर बसून होणारी खरेदी तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलसमोर दुचाकी लावून होणारी खाद्यंती यापुढे वाहनचालकांना महागात पडणार आहे. रस्त्याच्या कडेचे विविध स्टॉल आणि रस्त्यावर बसणारे भाजी विक्रते यांच्यापुढे दुचाकी उभी केल्यास महापालिकेकडून दंड आकारला जाणार आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून आयुक्त कार्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल. भाजी, किरकोळ खरेदी किंवा खाण्यासाठी गाडी रस्त्यावर लावल्यास किंवा गाडीवर बसून अशी खरेदी केल्यास दोन हजार रुपये दंड आकाराला जाणार आहे. या निर्णयामुळे वाहतुकीला शिस्त लागेल आणि वाहतूक कोंडी टाळता येईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

शहरात सध्या बहुतांश भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सम आणि विषम पार्किंग लक्षात न घेता वाहनावरच बसून बाजारहाट करण्याला वाहनचालक प्राधान्य देतात. सध्या शहरातील प्रमुख रस्ते, उपरस्ते, चौक अतिक्रमणमुक्त करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने स्वीकारले आहे. याअंतर्गत मध्यवर्ती भागासह, उपनगरात अतिक्रमण निमूर्लन कारवाई करण्यात आली. यापुढील टप्पा म्हणून आता वाहनांवर बसून बाजारहाट करणा-यांवर तसेच स्टॅलसमोरच गाड्या लावून खाद्यंती करणा-यांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे.

शहरातील बहुतांश रस्त्यांवरील पदपथांवर खाद्यपदार्थ, किरकोळ साहित्य विक्री, भाजी विक्री केली जाते. तेथे खरेदी करण्यासाठी खाद्यपदार्थ, भाजी विक्रीचे स्टॉल, पथारींपुढेच दुचाकी तसेच चारचाकी वाहने लावली जातात. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे रस्त्यावर उभ्या करण्यात येणा-या वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय अतिक्रमण निमूर्लन विभागाने घेतला आहे.

खाद्यपदार्थ किंवा भाजी विक्रीच्या पथारीपुढे वाहने उभी राहिल्यास त्यांना जॅमर लावण्यात येईल. हा भाग नो पार्किंग झोन म्हणून निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात येणार असून त्याबाबतची प्राथमिक चर्चा पोलिसांबरोबर झाली आहे. पथारीपुढे वाहन लावल्यास दोन हजार रुपये दंड आकारण्याचे नियोजित आहे, असे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महापालिकेच्या या प्रस्तावित निर्णयाला पथारी व्यावसायिक पंचायतीने विरोध दर्शविला आहे. महापालिका अधिकृत पथारी व्यावसायिकांकडून भरमसाठ शुल्क आकारत आहे. या परिस्थितीत पथारीसमोरील परिसार नो पार्किंग झोन केल्यास त्याच परिणाम व्यवसायावर होईल, त्यामुळे आधी महापालिकेने वाहनतळ उपलब्ध करावेत किंवा वाहनचालकांना वाहने लावण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव प्रशासनाकडून दामटण्यात आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पथारी व्यावसायिक पंचायतीचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी दिला.