पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे माेटारीच्या अपघात प्रकरणात संगणक अभियंता तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवून त्याच्याविरुद्ध खटला चालविण्याचा अर्ज बाल न्याय मंडळाने (जेजीबी) मंगळवारी फेटाळला. या निर्णयामुळे अल्पवयीन मुलाला दिलासा मिळाला आहे. अल्पवयीनांसाठी असलेल्या कायद्यानुसार मुलाविरुद्ध खटला चालणार आहे. मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकारी गरिमा बागरोडिया, सदस्य ॲड. स्मिता जामदार आणि ॲड. बेदी बोर्डे यांनी याबाबतचे आदेश दिले.

कल्याणीनगर भागात १८ मे २०२४ रोजी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याचा अल्पवयीन मुलगा परदेशी बनावटीची मोटार चालवित होता. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मोटारचालकाला सज्ञान (प्रौढ) म्हणून त्याच्याविरुद्ध खटला चालवावा, असा अर्ज बाल न्याय मंडळात पोलिसांनी केला होता. या प्रकरणात मुलाच्या वतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

मुलाच्या वकिलांचा युक्तिवाद काय ?

सर्वोच्च न्यायालयाने काही खटल्यात अल्पवयीन आरोपीला सज्ञान ठरविण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. या गुन्ह्यात मुलाला सज्ञान ठरविण्याबाबत कोणतेही कायदेशीर निकष नाहीत, तसेच हा गंभीर गुन्हा नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलाला सुधारण्याची संधी देऊन त्याच्याविरुद्ध बाल न्याय कायद्याच्या तरतुदीनुसार खटला चालवावा, असा युक्तिवाद ॲड. प्रशांत पाटील यांनी केला होता. या वेळी ॲड. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांचा संदर्भ दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याणीनगर अपघात प्रकरण गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. बाल न्याय मंडळाने निकाल मिळाल्यानंतर पोलिसांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर दाद मागण्याबाबतचा निर्णय घेणार आहे. अल्पवयीन मुलांवर दाखल होणारे गुन्हे, त्याबाबतचे कायदे, तसेच न्यायालयीन प्रकिया याबाबतच्या तरतुदीवर आता चर्चा होणे गरजेचे झाले आहे, असे कायद्याचे अभ्यासक म्हणून माझे मत आहे. – ॲड. शिशिर हिरे, विशेष सरकारी वकील.