रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३ लाख ४१ हजार जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्याकडून तब्बल २४ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे विभागात पुणे रेल्वे स्थानकावर विनातिकीट प्रवाशांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर यासाठी सातत्याने तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत केलेल्या कारवाईची आकडेवारी रेल्वेने जाहीर केली आहे. या कालावधीत पुणे विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३ लाख ४१ हजार १८० जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २४ कोटी ६५ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये सात वर्षांत दीड लाख नवीन मालमत्ता; गेल्या वर्षभरात २६ हजार मालमत्तांची भर

पुणे विभागात मार्च महिन्यात २१ हजार ७५६ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ कोटी ७२ लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याचबरोबर अनियमित प्रवास करणाऱ्या ७ हजार ५० जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४० लाख रुपयांहून जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. नोंदणी न करता सामान घेऊन जाणाऱ्या २१५ प्रवाशांवर मार्चमध्ये कारवाई करण्यात आली आहे. त्यांना २३ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकांकडून ही कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

फुकट्या प्रवाशांवर कारवाई (एप्रिल २०२२ ते मार्च २०२३)

– विनातिकीट प्रवासी : ३ लाख ४१ हजार १८० –

दंडाची रक्कम : २४ कोटी ६५ लाख रुपये