पुणे: यंदाच्या उन्हाळी मोसमात पुणे जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. १ मार्च ते २६ मे या कालावधीत जिल्ह्यात सरासरीपेक्षा १२३२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून, केवळ मे महिन्यात सरासरीपेक्षा २०२५ टक्के जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार, त्यानंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरवर्षी मे महिन्यात उन्हाची तीव्रता, तापमान याची चर्चा असते. यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तीव्र उष्मा होता. मात्र, त्यानंतर हवामानात झपाट्याने बदल झाला. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे वातावरण ढगाळ होऊन अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू लागल्या. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाणही वाढू लागले. काही ठिकाणी वादळी पाऊस पडला. पुणे जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी ९.७ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा २०६.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर उन्हाळी मोसमाची जिल्ह्यातील पावसाची सरासरी १५.९ मिलीमीटर असून, यंदाच्या मोसमात २११.८ मिलीमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची तीव्रता यंदा जास्त आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र सध्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे आहे. त्यामुळे सध्या जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.’
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यात शिवाजीनगर येथे २१.९ मिलीमीटर, लोहगाव येथे २९.४, चिंचवड येथे २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.