महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र तांत्रिक सेवा २०२२ परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या परीक्षेद्वारे एकूण ३७८ पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, महाराष्ट्र तांत्रिक सेवा २०२२ संयुक्त पूर्व परीक्षा १७ डिसेंबरला सहा जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार आहे.
हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान पाडला जाणार ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख
वनक्षेत्रपाल, कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, स्थापत्य सहायक अभियंता, विद्युत यांत्रिकी सहायक अभियंता आदी पदे या परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. या पदांसाठी निश्चित केलेल्या अटी आणि शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये केला जाईल. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालात समाविष्ट केली जातील, असे एमपीएससीने स्पष्ट केले.