पुणे : ‘भरत नाट्य मंदिराला वैभवशाली परंपरा लाभली आहे. मात्र, रसिकांच्या सोयीसाठी आता भरत नाट्य मंदिराचा पुनर्विकास करायला हवा. वाहनतळाच्या सुविधेसह प्रशस्त सभागृहाचीही निर्मिती करणे आवश्यक आहे,’ असे मत कोहिनूर समूहाचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल यांनी बुधवारी व्यक्त केले. भरत नाट्य मंदिराच्या पुनर्विकासासाठी आर्थिक मदत करण्याची तयारी असल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित संगीत नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनावेळी गोयल बोलत होते. ज्येष्ठ नाट्यकर्मी सुरेश साखवळकर, सनदी लेखपाल विजयकांत कुलकर्णी, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त डॉ. जगदीश पाटील, सांस्कृतिक कार्य विभागाच्या विभागप्रमुख जान्हवी जानकर, वर्षा जोगळेकर आदी या वेळी उपस्थित होते.

या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित ‘संगीत स्वयंवर’ हे कलाव्दयी निर्मित संगीत नाटक बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने सादर केले. या नाटकाला देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचे संगीत लाभले आहे.

‘संगीत रंगभूमी ही आपली अमूल्य परंपरा असून, गेल्या काही वर्षांत संगीत रंगभूमी दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे. संगीत रंगभूमीला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होण्याची गरज आहे,’ असे मत साखवळकर यांनी व्यक्त केले.

साखवळकर म्हणाले की, संगीत आणि नाटक सध्या वाईट स्थितीत असून, पुढील काळात ते सुरू राहण्यासाठी सरकारने संगीत आणि नाटकांच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे. आजही राज्यात कला सादर करणारे अनेक चांगले कलावंत आहेत. मात्र, नाटकांचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असल्याने कला सादर करताना मर्यादा येत आहेत. अभय जबडे यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग मुखडे यांनी आभार मानले.

आज आणि उद्या पर्वणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या महोत्सवात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज गुरुवार, दिनांक २० मार्च ‘संगीत बावनखणी’ हे विद्याधर गोखले लिखित आणि यशवंत देव यांचे संगीत असलेले नाटक विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान सादर करणार आहे. श्रीकांत दादरकर यांनी हे नाटक दिग्दर्शित केले असून संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर यांचे, तर नृत्य मार्गदर्शन स्मृति तळपदे यांचे आहे. महोत्सवात तिसऱ्या म्हणजे शेवटच्या दिवशी शुक्रवार, दिनांक २१ मार्च २०२५ रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे निर्मित ‘संगीत मानापमान’ हे नाटक सादर केले जाणार आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाला गोविंदराव टेंबे यांचे संगीत लाभले आहे.