पुणे : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण घेता येण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणे, एच. जी. फाउंडेशन, सेर्राला इंडिया आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) यांनी पुढाकार घेतला आहे. ‘अस्मिता नेक्स्ट’ या अनोख्या उपक्रमांतर्गत मुलींसाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे.
रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी – पुणे या क्लबला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने नुकताच एक विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अस्मिता नेक्स्ट उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. रोटरी फाउंडेशन, दक्षिण आशियाच्या प्रमुख शकुंतला राहा, अमेरिकेच्या पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मीना पटेल, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे (पीआयसीटी) प्राचार्य डॉ. संजय गंधे, सेर्राला इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक अरोरा, एच आर प्रमुख स्वाती मिंच, फॉरेन पार्टनर असलेल्या रोटरी क्लब ल्यूटन नॉर्थचे बॉब शहा, अस्मिता नेक्स्ट उपक्रमाचे समन्वयक जिग्नेश पंड्या या वेळी उपस्थित होते.
पंड्या म्हणाले, ‘अस्मिता नेक्स्ट उपक्रमात दोन तुकड्यांमध्ये मुलींना कृत्रिम बुद्धिमत्तेचे मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ‘पीआयसीटी’मध्ये हे प्रशिक्षणवर्ग होतील. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शास्त्र शाखेची पदवी आणि कोडिंगचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. या मुलींची निवड रोटरी सदस्यांच्या मदतीने करण्यात येईल. संबंधित विद्यार्थिनींचे शुल्क ‘रोटरी’कडून भरण्यात येईल. तसेच त्यांना लॅपटॉप, ऑन जॉब ट्रेनिंगही देण्यात येणार आहे. प्रकल्पातील प्रत्येक मुलीच्या प्रशिक्षणासाठी सुमारे एक ते सव्वालाख रुपये खर्च अपेक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना या विशेष अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे. अभ्यासक्रमासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे डॉ. गंधे यांनी सांगितले.