पुणे : मोटर वाहन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) वायुवेग पथकाने जप्त केलेली ३८ वाहने दंडात्मक रक्कम भरून ताब्यात घेण्यास वाहनमालकांकडून टाळाटाळ केली जात असल्याने आरटीओने या वाहनांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ ऑक्टोबरला सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ई-लिलाव केला जाणार आहे.
या वाहनांचा ई-लिलाव टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. संबंधित वाहनमालक, चालक, वित्तदाते किंवा ज्या कोणाशी वाहन संबंधित आहे, त्यांना लिलावाच्या तारखेपूर्वी दंडात्मक महसूल भरून किंवा हक्क सांगून वाहन सोडवून घेता येणार आहे. लिलावानंतर कोणतीही हरकत ग्राह्य धरली जाणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.
मोटर वाहन कायद्यानुसार, थकीत कर, प्रलंबित परवाना नूतनीकरण, कागदपत्रांची पूर्तता नसलेली वाहने रस्त्यावर फिरत असल्याने वायुवेग पथकाकडून वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे. अशी वाहने आढळल्यास कारवाई करून जप्त केली जात आहेत. त्यानुसार शहरातील आरटीओ, हडपसर पीएमपी बस स्थानक, राजगुरुनगर पोलीस स्थानक आणि शेवाळवाडी येथील पीएमपी स्थानक येथे दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहने जप्त करून ठेवण्यात आली आहेत.
संबंधित वाहनधारकांना दंडात्मक रक्कम भरून ही वाहने सोडवून घेण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र, वाहने सोडवून घेण्यास वाहनमालक, चालकांकडून टाळाटाळ केली जात असल्याने या वाहनांचा ई-लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.
असा होणार लिलाव
येत्या १५ ऑक्टोबर रोजी वाहनांचा ई-लिलाव होणार आहे. तत्पूर्वी, ६ ते १३ ऑक्टोबर रोजी हडपसर, शेवाळवाडी आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे ही वाहने पाहता येणार आहेत. इच्छुकांना http://www.eauction.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे संगणकीकृत स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) असणे बंधनकारक आहे. नावनोंदणी व पडताळणीसाठी ऑनलाइन अर्जाबरोबर दुचाकी वाहनांसाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम, तर ट्रक, मिनीबस, बस, स्लीपर बस या वाहनांसाठी ५० हजार रुपये अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्ट आरटीओ, पुणे या नावाने काढावा लागणार आहे. त्यानंतर लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन बोली लावता येणार आहे.