पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले असून तब्बल पावणेदोन हजारांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. महिलांसह वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून शीघ्र कृती दल (क्यूआरटी), बॉम्बशोधक व नाशक पथक, राड्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्याही तैनात केल्या आहेत. वाहतुकीच्या अनुषंगाने बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे या वेळी उपस्थित होते.
गिल म्हणाले, ‘संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा रविवारी (२२ जून) उरुळीकांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगांव फाटा येथे प्रवेश होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झेंडेवाडी येथे आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दोन्ही पालखी सोहळयाच्या मार्गावर अवजड वाहनांचा अडथळा होऊ नये, यासाठी १२ ठिकाणी विशेष पोलीस अधिकारी आणि वाहतूक अमंलदारांची नियुक्ती केली आहे. अनावश्यक वाहने येऊ नये, यादृष्टीनेही व्यवस्थापन केले आहे. तसेच दोन्ही पालखी सोहळयात प्रत्येकी १५ अमंलदार हे साध्या वेषात कार्यरत राहणार आहेत.
‘पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अधिपत्याखाली विशेष पथक तैनात केले आहे. तसेच दोन्ही पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकरी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हरितवारी मार्गावर शक्ती अभियान अंतर्गत महिलांची दोन पथके दक्ष राहणार आहेत. रथामधील माउलींचे दर्शन घेताना पुरुष आणि महिला भाविकांची गर्दी होते. अशावेळी सोनसाखळी चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. आरोग्य पथकाच्या मदतीसाठी दोन पोलीस पथके तयार ठेवली आहे. दरम्यान, पालखी मार्गावर मद्यविक्री आणि मांसविक्री होणार नाही यासाठी दक्षता घेतली आहे,’ असेही गिल यांनी सांगितले.
निर्मलवारी अन हरितवारी पथक
पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर त्या मार्गावरील साफसफाई करण्यासाठी जिल्हा परिषद, पुणे याच्याकडून निर्मलवारी अंतर्गत साफसफाई केली जाणार आहे. तसेच हरितवारी अंतर्गत जनजागृती, वृक्ष लागवडीबाबत महत्त्व पटवून दिले जाणार आहे. पालखी सोहळा दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पालखी सोहळा विश्वस्त आणि पोलीस दलाच्या सहयोगाने प्रत्येक विसावा आणि मुक्कामाचे ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पोलीसांचा सहभाग असणार आहे. दरम्यान, पालखी विश्वस्थ आणि पालखी व्यवस्थेत सहभागी सदस्यांच्या वाहनांसाठी पासेस दिले आहेत.
पोलीस सर्वेलन्स व्हॅनची नजर
पालखी मार्गावर महिलांसह इतरांच्या सुरक्षिततेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. पोलीस सर्वेलन्स व्हॅनद्वारे सीसीटीव्हीची नजर ठेवली जाणार आहे. पोलीस पथकासह अद्ययावत व्हॅन तैनात केल्या आहेत. पोलीस अंमलदार १ हजार ६२४, पोलीस अधिकारी १८३, होमगार्ड १ हजार १८७, एसआरपीएफ दोन कंपन्या, आरसीपीपथक, क्यूआरी प्रत्येकी दोन पथक तैनात केले आहेत. पोलीस अधिक्षक संदीपसिंग गिल, अप्पर अधीक्षक रमेश चोपडे, बारामतीचे अप्पर अधीक्षक गणेश बिरादार बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्यातील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून बंदोबस्ताची जय्यत तयारी केली आहे. वारकऱ्यांसह महिलांच्या सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेतली आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त, पर्यायी वाहतूक व्यवस्था, वेगवेगळ्या पथकांचा पोलीस बंदोबस्त सोहळ्यात बारकाईने लक्ष ठेवणार आहे. –संदीपिंसग गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण