पुणे : महारेराने घेतलेल्या स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटच्या नुकत्याच झालेल्या सहाव्या परीक्षेचा निकाल ८९ टक्के लागला आहे. या परीक्षेत पुण्यातील प्रवीण कांबळे हे ९८ टक्के गुणांसह प्रथम आले आहेत. विशेष म्हणजे, मुंबईतील ८४ वर्षीय दौलसिंह गढवी हेही परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

राज्यात एजंट परीक्षेसाठी बसलेल्या ७ हजार ६२४ पैकी ६ हजार ७५५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात ५ हजार ६३७ पुरुष आणि १ हजार ११८ महिलांचा समावेश आहे. यापैकी २६४ उमेदवार ज्येष्ठ नागरिक असून, त्यातील १३ महिला आहेत. एजंटसाठी आतापर्यंत ६ परीक्षा झाल्या असून, त्यात २० हजार १२५ जण उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे हे सर्वजण एजंट म्हणून काम करण्यासाठी पात्र ठरले आहेत. महारेराने १० जानेवारी २०२३ पासून एजंटची नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे एजंट म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

स्थावर संपदा क्षेत्रातील एजंट हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे . बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच  मिळते. एजंटचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटना  रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहिती असायला हव्यात.  त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार,  घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र, चटई क्षेत्र,  दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक  माहिती देताना त्यात स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच  महारेराने  हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी माझ्याकडे एखाद्या बांधकाम व्यावसायिकाकडे विक्री प्रतिनिधी म्हणून नोकरी करण्याचा पर्याय उपलब्ध होता. आता परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मी एजंट म्हणून पात्र ठरलो आहे. त्यामुळे मला स्वतंत्रपणे घरांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू करणे शक्य होणार आहे. – प्रवीण कांबळे, एजंट परीक्षेत प्रथम आलेला उमेदवार