पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, पुण्यात जीबीएसचे रुग्ण आधीपासून आढळत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या वर्षी शहर परिसरातील खासगीसह सरकारी रुग्णालयांमध्ये जीबीएसच्या १८५ रुग्णांची नोंद झाली होती.
पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या यंदा जानेवारी महिन्यात अचानक वाढली. ही रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होऊ लागले. याचबरोबर जीबीएसबाबत अनेक गैरसमज पसरू लागले. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांकडून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत आढळलेल्या जीबीएस रुग्णांची आकडेवारी संकलित केली. त्यातून गेल्या वर्षी शहरात जीबीएसचे १८५ रुग्ण आढळून आल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या वर्षी जीबीएसच्या सर्वाधिक ३२ रुग्णांची नोंद दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झाली. त्याखालोखाल केईएम रुग्णालयात ३० रुग्णांची नोंद झाली असून, ससून सर्वोपचार रुग्णालय २२, ज्युपिटर रुग्णालय २१, जहांगिर रुग्णालय २०, भारती रुग्णालय १९, काशीबाई नवले रुग्णालय १२, सह्याद्री रुग्णालय १०, इनलॅक्स रुग्णालय ५, डॉ. सॅम्स रुग्णालय आणि रुबी हॉल क्लिनिक प्रत्येकी ४, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय आणि सना रुग्णालय प्रत्येकी २, शाश्वत रुग्णालय आणि सिम्बायोसिस रुग्णालय प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या होती, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
ससूनमध्ये गेल्या वर्षी ८ मृत्यू
ससून सर्वोपचार रुग्णालयात जीबीएसमुळे गेल्या वर्षी ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात १, फेब्रुवारीत २, सप्टेंबर २, नोव्हेंबर २ आणि डिसेंबर १ अशा एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव यांनी दिली.
शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आधीपासून आढळून येत आहेत. गेल्या वर्षी शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. गेल्या वर्षी अशा एकूण १८५ रुग्णांची नोंद झाली होती.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका