पुणे : ‘गेल्या १४ दिवसांपासून संसदेचे अधिवेशन चालू आहे. मात्र, एकही दिवस संसदेचे कामकाज झालेले नाही. आम्ही संसदेत जातो, सही करतो. मात्र, तिथे केवळ गोंधळ असतो,’ अशी खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.
‘सॅटर्डे क्लब’तर्फे आयोजित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात पवार बोलत होते. ‘राज्याकर्त्यांकडून संसदेचे कामकाज बंद पाडले जाते. विरोधकांना कोणताही मुुद्दा मांडून दिला जात नाही. त्याविरोधात सुमारे ३०० खासदारांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. मात्र, आम्हाला अटक करण्यात आली,’ असेही ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, धीरज देशमुख, ज्येष्ठ लेखिका-कवयित्री अरुणा ढेरे, विठ्ठल-रूक्मिणी संस्थानाचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील अशी मोठ्या अंत:करणाची माणसे होती. त्यांनी राजकारणातील तरुणांची नवी पिढी घडवली. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला आहे. ज्यांचे सरकार मी पाडले, त्या वसंतदादांनीच मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव पुढे केले होते. गांधी-नेहरूंचा विचार मजबूत करण्यासाठी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. विरोधाचा आवाज दाबला जातो.’
‘संसदीय लोकशाही टिकवायची आहे, की नाही,’ असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, ‘आता गांधी-नेहरूंचा विचार मान्य असणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याची भूमिका घ्यायला हवी. देशाच्या हितासाठी एकत्र राहिले पाहिजे. नव्या पिढीत गांधी-नेहरूंचा विचार रुजवायला लागेल.’
‘साधक-बाधक चर्चा, टीका हा लोकशाहीचा आत्मा असतो. आता मात्र, त्याचे रूपांतर द्वेषात होताना दिसते आहे. विधिमंडळातच लोकप्रतिनिधी शिव्या देताना दिसतात. राजकारणातील संयम हरवला आहे. घसरलेले समाजभान आणि राजकारणाचे आताचे चित्र पाहून वेदना होतात. आपण खरेच निकोप लोकशाहीकडे चाललो आहोत का, हा प्रश्न पडायला लागतो,’ अशी खंत उल्हास पवार यांनी व्यक्त केली. अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत शिरोळे यांनी आभार मानले.
‘राजकारणातील वारकऱ्याचा गौरव’
राजकारणातील शेवटच्या वारकऱ्याचा सन्मान होत असल्याची भावना याप्रसंगी गहिनीनाथ महाराज औसेकर, धीरज देशमुख यांनी व्यक्त केली. ‘उल्हास पवारांसारखा रसिक सांगणाऱ्यालाही धन्य करून टाकतो,’ अशी भावना ढेरे यांनी व्यक्त केली, तर थोरात यांनी पवारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
गोपाळकाला हा सगळ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने साजरा केला जायचा. मात्र, आता त्यामागची अध्यात्मिक बैठक मोडलेली दिसते. लोकशाही आणि समाजभान ‘प्रगल्भ’ असल्यामुळे आज पुण्यातले सगळे रस्ते अडवले गेले आहेत. – उल्हास पवार