पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची ३८ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मार्केट यार्ड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २१ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक व्यापारी आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर नोव्हेंबर महिन्यात संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यांनी पैसे भरल्यानंतर चोरट्यांनी त्यांना सुरुवातीला परतावा दिला. त्यानंतर परतावा देणे थांबविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
हेही वाचा : एकतर्फी प्रेमातून युवतीचे अपहरण, नवी मुंबईतून युवतीची सुटका
दुसऱ्या एका घटनेत सायबर चोरट्यांनी एका महिलेची सहा लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप तपास करत आहेत. विश्रांतवाडी भागातील एकाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत.