पुणे : पुणे-सिंगापूर (एआय-२१११-१०) विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर ‘एअर इंडिया’च्या ताफ्यातील विमानांच्या तक्रारी समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) ‘एअर इंडिया’च्या विमानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असल्याने ही विमानसेवा काही काळ बंद ठेवत असल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून (एएआय) जाहीर करण्यात आले.
‘एअर इंडिया’ची दिल्ली-पुणे-सिंगापूर अशी सेवा देण्यात येते. सिंगापूरच्या विमानांची सेवा काही काळ रद्द केल्याने त्याचा फटका पुणे दिल्लीच्या सेवेला बसला असून पुणे-सिंगापूर-पुणे विमानसेवा रद्द झाल्याचे ‘एअर इंडिया’ने पत्रकाद्वारे जाहीर केले.
सिंगापूरला जाण्यासाठी आठवड्यातून पाच दिवस हे विमान असते. सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी उड्डाणे असतात. विमान दिल्लीवरून असले, तरी पुण्यातून सिंगापूरला जाण्यास प्रवाशांची पसंती अधिक असते. विमानसेवा काही काळ बंद केल्याने ज्या प्रवाशांनी सिंगापूरला जाण्यासाठी आरक्षण केले आहे, त्यांना विमान कंपनीने तिकिटाची रक्कम पुन्हा देऊ केली आहे.