पिंपरी : गायक राहुल देशपांडे यांच्या दिवाळी पहाट मैफलीला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. साडेचार हजारांहून अधिक रसिक श्रोत्यांनी उपस्थिती लावली. राहुल देशपांडे यांनी अहिर भैरव रागातील ‘अलबेला सजन आयो रे…’ या द्रुत बंदिशीतील खयालाने मैफलीचा प्रारंभ केला.

निगडी प्राधिकरणातील नियोजित महापौर निवास मैदानावर शुक्रवारी दिवाळी पहाट रंगली. माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, सलीम शिकलगार, अरुण थोरात, अतुल इनामदार यावेळी उपस्थित होते.

‘तुज मागतो मी आता…’ या गणेशस्तवनानंतर संगीत ‘सौभद्र’मधील ‘प्रिये पहा…’ आणि ‘राधाधर मधुमिलिंद…’ तसेच ‘कट्यार काळजात घुसली’मधील ‘तेजोनिधी लोहगोल…’ या नाट्यगीतांनी राहुल देशपांडे यांनी रसिक श्रोतृवर्गाची उत्स्फूर्त दाद मिळवली. मैफलीच्या उत्तरार्धात ‘मोगरा फुलला…’ ही ज्ञानेश्वरमाउलींची भक्तिरचना सादर करून देशपांडे यांनी श्रोत्यांना भक्तिरसात भिजवले; तर ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या…’ , ‘पानी रे पानी रे…’, ‘अपनेही रंग में रंग दे…’ अशा वैविध्यपूर्ण फ्युजनने संमिश्र श्रवणानंद दिला. ‘कट्यार काळजात घुसली’मधील ‘दिल की तपीश हैं…’ या गीताने मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांना ‘कानडा राजा पंढरीचा…’ या भक्तिरचनेच्या उत्कट सादरीकरणाने भक्तिरसात न्हाऊ घातले.

भारावलेल्या जनसमुदायाने विठुनामाचा गजर करीत उभे राहून सर्व कलाकारांना मानवंदना दिली. राहुल देशपांडे यांना रितेश (गिटार), निनाद (बासरी), रोहन (ऑक्टोपॅड), विशाल (की बोर्ड), मिलिंद (हार्मोनियम) आणि निखिल (तबला) यांनी सुरेल साथसंगत केली. संतोष यांनी संगीत संयोजन केले.