पुणे : नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उर्वरित भागाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हे सर्व काम पूर्ण करून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू केले आहे. तीन टप्प्यांत हा उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे. या पुलापैकी अखेरच्या टप्प्यातील फनटाइम चित्रपटगृह ते विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा पूल नागरिकांना वापरण्यासाठी खुला करण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे. या उड्डाणपुलाच्या कामाची नुकतीच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पाहणी केली.
‘सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने या रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. राजाराम पूल चौक ते विठ्ठलवाडी जंक्शन हा कमी अंतराचा उड्डाणपूल गेल्या वर्षी महापालिकेने वाहतुकीसाठी खुला केला. जानेवारी २०२५ मध्ये विठ्ठलवाडी जंक्शन येथून फनटाइमकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
फनटाइम चित्रपटगृहाकडून विठ्ठलवाडी जंक्शनकडे जाणाऱ्या पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना रॅम्प आणि पुलाखालील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम अपूर्ण आहे. हे काम आता पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे शिल्लक आहेत. ही कामे पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करून हा पूलदेखील वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल,’ असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.
सन सिटी ते कर्वेनगर पुलाचा अडथळा दूर
सन सिटी ते कर्वेनगर दरम्यान नदीवर महापालिकेने पूल बांधला आहे. या पुलाला जोडण्यासाठी आवश्यक रस्ता तयार करण्यासाठी येथील एका जागेचे संपादन करावे लागणार होते. हा तिढादेखील आता सुटला आहे. संबंधित जागामालकांशी महापालिकेने चर्चा करून त्यावर तोडगा काढला आहे. आठ दिवसांत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या रस्त्याचे कामदेखील सुरू केले जाणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना शहराच्या इतर भागात जा-ये करण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.