पुणे : आज देशात लोकशाहीचे अक्षरशः वस्त्रहरण सुरू झाले आहे. त्याविरोधात राज्य घटनेने दिलेल्या अधिकारांनुसार तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत आहे. आता नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. हे करूनही गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह करावा लागेल, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केली. ईव्हीएमबाबत संशय घेण्यास जागा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

महात्मा फुले वाडा येथे डॉ. आढाव यांनी गुरुवारपासून आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, संदेश भंडारे या वेळी उपस्थित होते. हे उपोषण ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. डॉ. आढाव म्हणाले, की अदानींचे प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशातून त्यांना पाठिंबा दिला. या प्रकरणाची संसदेत वाच्यताही होऊ नये म्हणून जे चालले आहे ते लांछनास्पद आहे. विधानसभा निवडणुकीत सरकारी पैशाचा खुळखुळा वाजला. जनतेने या पैशाला भुलू नये. मतदानानंतर मतदानाच्या आकडेवारीमध्ये सतत बदल होतात. त्यामुळे ईव्हीएमबाबत शंका घेण्यास जागा आहे आणि ती रास्त आहे. हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केले जात आहेत. मुस्कटदाबीच्या विरोधात समाजातील जागरूक वर्गाने बोलले पाहिजे. एकटा माणूसही बोलू शकतो ही लोकशाहीची शक्ती आहे.

हेही वाचा : हेल्मेटसक्तीचा आता नवा नियम… कशी आणि कोणावर होणार कारवाई?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेते डॉ. आढाव यांच्या भेटीला

महात्मा फुले समता पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी फुलेवाडा येथे आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यक्रमानंतर डॉ. आढाव यांची भेट घेतली. भुजबळ यांनी डॉ. आढाव यांना प्रकृतीची काळजी घेण्याबाबत सांगितले. तसेच आमदार रोहित पवार यांनीही डॉ. आढाव यांची भेट घेतली.