पुणे : दर्शनाासाठी निघालेल्या कुटुंबाला धमकावून चोरट्यंनी लूटमार केल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यात घडली. चोरट्यांनी लूटमार केल्यानंतर युवतीला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर दौंड, भिगवण पोलिसांची पथके चोरट्यांना पकडण्यासाठी रवाना झाली आहेत.
पुण्याहून एक कुटुंब मोटारीतून रविवारी सोलापूरकडे निघाले होते. देवदर्शनासाठी निघालेले कुटुंब पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली गावाजवळ असलेल्या एका उपाहारगृाहजवळ सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास थांबले. मोटार उपाहारगृहासमोर लावून त्यांनी चहा प्याला. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी कुटुंबाला कोयताचा धाक दाखविला. कुटुंबातील सात जणांमध्ये महिला होत्या. महिलांना धमकावून त्यांच्याकडील दागिने हिसाकावून घेतले. त्या वेळी मोटारीत अल्पवयीन युवती होती. एका चोरट्याने तिला कोयत्याचा धाक दाखवून उपाहारगृहाच्या परिसरात असलेल्या झाडीत नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. युवतीने आरडाओरडा केला. त्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.
या घटनेनंतर घाबरलेले कुटुंब मोटारीतून दौंड परिसरात आले. त्यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी तातडीने तपास सुरू करण्याचे आदेश दौंड पोलिसांना दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. चोरट्यांना पकडण्यासाठी दौंड, भिगवण, तसेच स्थानिक पाेलिसांनी पथके तयार केली आहेत. चोरट्यांच्या मागावर पोलिसांची पथक असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
सोलापूर महामार्गावर लुटमारीच्या घटना
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. या भागात यापूर्वी लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. या भागात गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुण्याहून मोटारीतून सोलापूरकडे निघालेल्या कुटुंबाला स्वामी चिंचोली गावाजवळ चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली. चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून महिलांचे दागिने लुटले, तसेच अल्पवयीन युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार देण्यात आली आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी या भागातील सराइत चोरट्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. – बापूराव दडस, उपविभागीय आधिकारी, दौंड विभाग