पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल १० मे रोजी लागणार आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सरकार पक्ष, तसेच बचाव पक्षाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर जवळपास अकरा वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी झाली होती. हत्येनंतर आठ वर्षांनी खटला सुरू झाला होता. सुरुवातीला पुणे पोलिसांनी तपास केला होता.

हेही वाचा >>> राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने जून २०१४ मध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास सोपविण्यात आला होता. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात १५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी सुरुवातीला जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्यानंतर न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सध्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सीबीआयचे वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदारांची साक्ष नोंदविली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपनिश्चिती कलमे

आरोपी तावडे, अंदुरे, कळसकर, भावे यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), १२० (ब) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि  यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुनाळेकर आणि भावे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.