पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील सुखसागरनगर भागात शुक्रवारी घडली. मार्केट यार्डातील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सुखसागरनगर भागात अपघात झाला.

श्रेया गौतम येवले (वय २१, रा. शीतल हाईट्स, खंडोबा मंदिराजवळ, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता), दत्तात्रय भरत गाडेकर (वय ४५, रा. शिक्षक सोसायटी, गोकुळनगर, कात्रज-काेंढवा रस्ता) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया ओैषधनिर्माणशास्त्र शाखेत शिकत होती. ती एका ओैषध विक्री दुकानात सध्या प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत ती ओैषध दुकानात काम करायची. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ती सुखसागरनगर परिसरातून निघाली होती. त्या वेळी भरधाव मोटार थेट पदपथावर गेली. तेथून निघालेल्या श्रेयाला मोटारीने धडक दिली. मोटारीने पदपथावर असलेल्या एका झाडाला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच बिबवेवाडी आणि कोंढवा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मोटारचालक होनमाने आणि त्याच्या नातेवाईक गाडेकर यांना ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी होनमाने एका कंपनीची मोटार भाडेतत्त्वावर घेऊन तो प्रवासी वाहतूक करायचा. तो त्याचा नातेवाईक गाडेकरला मोटार शिकवित होता. नियंत्रण सुटल्याने मोटार थेट पदपथावर शिरली. या घटनेनंतर सुखसागरनगर भागातील नागरिक जमा झाले. त्यांनी मोटारचालक होनमाने याच्यासह गाडेकरविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. शहर परिसरात गंभीर स्वरुपाच्या अपघातात वाढ झाली आहे. अपघातात गेल्या काही दिवसांत बारा जणांचा मृत्यू झाला आहे.